Crime News
रायगड : उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या एका महिलेचा रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायगड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने व मोठ्या शिताफीने सत्वर तपास करत, उत्तर प्रदेशातीलच असणाऱ्या दोन आरोपींचा माग काढून त्यांना पुण्यातील पिंपरी परिसरातून अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. कौटुंबिक वादातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
२५ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३५ वाजण्याच्या सुमारास पुणे-माणगाव रस्त्यावरील ताम्हिणी घाटात, कोंडेथर गावाच्या हद्दीत दरीमध्ये २५ ते ३० वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला होता. सुरुवातीला माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन व तपासादरम्यान या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) व २३८ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके तैनात करण्यात आली. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवली. मृत महिलेचे नाव सुमन गोपाल यादव (वय २५-३०, सध्या रा. चिखली, पुणे; मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असल्याचे निष्पन्न झाले.
महिलेची ओळख पटल्यानंतर एलसीबीच्या पथकाने वेगाने सूत्रे हलवून संशयितांचा ठावठिकाणा शोधून काढला. पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात सापळा रचून मूळ उत्तर प्रदेशातील असलेल्या दुर्गाप्रसाद मंगालप्रसाद प्रजापती (वय २४, सध्या रा. कुंदलवाडी, चिखली, पुणे; मूळ रा. वैणीयाघास, ता. सिकटा, जि. दुमरीयागंज, उत्तर प्रदेश) आणि दिनेशकुमार बिसराम प्रजापती (वय २७, सध्या रा. कुंदलवाडी, चिखली, पुणे; मूळ रा. सिमराबडसिया, ता. दुमरीयागंज, उत्तर प्रदेश) दोन संशयित आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
संशयित आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. कौटुंबिक वादाच्या कारणावरून सुमन यादव हिला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात आणण्यात आले. तेथे ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह घाटातील दरीत फेकून देण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.
पोलीस पथकाने २४ तासांच्या आत या संपूर्ण खूनाचा उलगडा करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, कौटुंबिक वादाचे मूळ कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास माणगाव पोलीस करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि मानसिंग पाटील, पोसई सुरज पाटील, पोसई नरेश निंबाळकर, सहाय्यक फौजदार संदीप पाटील व एलसीबी तसेच सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.