पावसाळी पर्यटनासाठी अद्याप प्रतीक्षा pudhari photo
रायगड

Raigad Monsoon Tourism : पावसाळी पर्यटनासाठी अद्याप प्रतीक्षा

मोठ्या पावसाअभावी ताम्हिणी घाट, देवकुंडमध्ये पाण्याचा प्रवाह कमीच

पुढारी वृत्तसेवा

रायगड : शरद निकुंभ

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला ताम्हिणी घाट, भिरा येथील प्रसिद्ध देवकुंड, निसर्गप्रेमींचे आकर्षण असलेले अंधारबन व खजिना ट्रेक, तसेच पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले विविध सीक्रेट पॉईंट्स यंदा जूनअखेरही ओस पडल्याचे चित्र आहे. जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी रायगड जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले नसल्याने पावसाळी पर्यटनाचा अक्षरशः हिरमोड झाला आहे.

परिणामी स्थानिक पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, गाईड व्यवसाय आणि आदिवासी बांधवांच्या रोजगारावर मोठे संकट ओढवले असून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. माणगाव तालुक्यातील पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे तसेच पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील ताम्हिणी घाट परिसर हा राज्यातील प्रमुख पावसाळी पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो.

दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून येथे पावसाचे जोरदार आगमन होताच सह्याद्रीच्या डोंगरकड्यांवरून असंख्य धबधबे कोसळू लागतात. हिरव्यागार डोंगररांगा, दाट धुके, ढगांची चादर आणि फेसाळणारे जलप्रपात अनुभवण्यासाठी राज्यासह देशभरातून हजारो पर्यटक येथे दाखल होतात. मात्र, यंदा निसर्गाचे हे मोहक रूप अद्याप अवतरलेले नाही.

भिरा येथील देवकुंड हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नैसर्गिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. कुंडलिका नदीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी पावसाळ्यात निळसर-हिरव्या पाण्याचा तलाव आणि त्यावर कोसळणारा जलप्रपात पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, यंदा पावसाअभावी देवकुंड परिसरातील जलप्रपाताला अद्याप अपेक्षित वेग आलेला नसून पर्यटकांची वर्दळ अत्यल्प आहे.

साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले अंधारबन आणि खजिना ट्रेक हे निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण मानले जाते. दाट जंगल, खोल दऱ्या, धुक्याने व्यापलेले मार्ग आणि दुर्मिळ पक्ष्यांचे वास्तव्य यामुळे या ट्रेकला मोठी मागणी असते. पावसाळ्यात प्रत्येक आठवड्याच्या शेवटी येथे ट्रेकर्सची गर्दी उसळते.

यंदा मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत हे संपूर्ण मार्ग निर्मनुष्य दिसत आहेत. विळे गावातून पुण्याकडे जाणारा ताम्हिणी घाट हा पावसाळी पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. घाटातील उंच डोंगरकडे, खोल दऱ्या, खाली उतरलेले ढग आणि शेकडो लहान-मोठे धबधबे यामुळे हा परिसर जणू निसर्गस्वर्गच वाटतो. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येथे वाहनांच्या रांगा लागतात.

कुंडलिका नदीतील व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग हा साहसी पर्यटनाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच अनेक पर्यटक या उपक्रमासाठी भिरा परिसरात दाखल होतात. मात्र, पर्यटकांची संख्या घटल्याने राफ्टिंगशी संबंधित व्यवसायांनाही आर्थिक फटका बसत आहे.

अप्रतिम निसर्ग

ताम्हिणी घाटातील अप्रतिम निसर्ग, फेसाळणारे धबधबे आणि धुक्यात हरवलेले डोंगर अनुभवण्यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहाने पर्यटक येथे येतात. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने अपेक्षित निसर्गसौंदर्य पाहायला मिळत नसल्याची भावना पर्यटक व्यक्त करीत आहेत. "ताम्हिणी घाटातील अप्रतिम निसर्ग आणि फेसाळणारे धबधबे मनाला प्रसन्न करतात. दरवर्षी आम्ही या काळात मित्रपरिवारासह येथे येतो. मात्र, यंदा पाऊसच नसल्याने निसर्गाचे ते मनमोहक रूप पाहायला मिळाले नाही. त्यामुळे आमचा हिरमोड झाला आहे," असे पर्यटक गिरीश म्हात्रे यांनी सांगितले.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आमच्या भागाला निसर्गाची अनमोल देणगी लाभली आहे. देवकुंड, ताम्हिणी घाट, अंधारबन ट्रेक आणि विविध सीक्रेट पॉईंट्स याठिकाणी दरवर्षी देशभरातून पर्यटक येतात. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने पर्यटकांची पावले थबकली आहेत. याचा थेट फटका स्थानिक व्यावसायिकांना बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आदिवासी बांधवांचाही रोजगार हिरावला गेला आहे. आता सर्वांचे लक्ष दमदार पावसाकडे लागले आहे.
आंदेश दळवी, माजी उपसरपंच व व्यावसायिक, पाटणूस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT