रायगड : पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्स या सोन्या-चांदिच्या दागीन्यांच्या पेढीवर 26 ऑगस्ट 2025 रोजी रात्री नऊ वाजता आंरराज्य टोळीतील दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून मालक भारत कांतीलाल जैन यांना गंभीर जखमी करुन 89 लाख रुपयांचा ऐवज लंपास केले होते. या दरोडा प्रकरणातील 10 आरोपींपैकी दोघांना सात वर्ष, चौघांना पाच वर्ष तर उर्वरित चौघांना चार वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा येथील रायगड जिल्हा न्यायालयातील मकोका न्यायालयाच्या विशेष न्यायाधिश श्रीमती सुनीता तिवारी यांनी शनिवारी सुनावली आहे.
गेली दहा वर्ष या खटल्याची सूनावणी सुरु होती. अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यावर शनिवारी न्यायालयाने शिक्षा सूनावली. संघटीत गुन्हेगारी सुनावणी दरम्यान न्यायालयात सिद्ध होवू शकली नाही. परिणामी न्यायालयाने अन्य कलमान्वये ही शिक्षा सूनावली असल्याची माहिती रायगड जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड.संतोष पवार यांनी दिली.
दरोडेखोरांच्या या टोळातील प्रमुख आरोपी तमिळनाडूमधील तुतकोडी येथील जिनाह उर्फ जे.के.नैनामोहम्मद लैवी आणि त्याचा प्रथम क्रमांकाचा साथीदार मुंबईतील विक्रोळी सुर्यानगर येथील करण रामआशिष विश्वकर्मा या दोघांना सात वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
उर्वरित आरोपींमध्ये इमदाद ईस्माईल मजावर (रा.श्रीगांव-पोयनाड), मोहम्मद अकबर कासीम (रा.पठाणवाडी,पर्व,मुंबई), मुबीन सगीर शेख(रा.कुर्ला-मुंबई)आणि बिलाल कासिम कुरेशी (रा.हुसेन चाळ,कुर्ला,मुंबई) या चौघांना पाच वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी आठ हजार रुपये दंड तर प्रदिप उर्फ बबलू लक्ष्मण पाटील(रा.श्रीगांव,पोयनाड), समीप भगवान पाटील(रा.श्रीगांव ,पोयनाड), सनी सुनील पाटील(रा.पोयनाड) या तीघांना चार वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दरोडेखोरांकडून चोरीचे सोन्याचे दागीने विकत घेणारा भाईंदर येथील पद्मावती नगर मध्ये राहाणारा बिपीन सोहनलाल बाफना या सोनारास चार वर्ष सश्रम कारावास आणि चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्स या सोन्या-चांदिच्या दागीन्यांच्या पेढीवर 26 ऑगस्ट 2025 रोजी दरोडा टाकताना पाच दरोडेखोरांनी चॉपर आणि रिव्ॉल्व्बरचा धाक दाखवून दुकानात प्रवेश करुन, मालक मनोज कांतिलाल जैन यांनी आरडाओरडा करुन हालचाल करु नये याकरिता यांच्या तोंडास व हातास प्लास्टीकची चिकटपट्टी बांधून ठेवली. त्यानंतर त्यांचे भाऊ भारत कांतिलाल जैन यांना मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले. दरोड्यातील एका आरोपीला स्थानिकांनी पकडले होते. मात्र उर्वरित आरोपी 80 लाख रुपये किमतीचे दागिने व नऊ लाख रुपयांची रोकड घेवून फरार होण्यात यशस्वी झाले होते.
55 साक्षीदारांच्या साक्षी तपास पथकाने 10 आरोपींच्या या आंतरराज्य टोळीलाच जेरबंद केले. पोयनाड येथे दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. वेगवेगळ्या विभागातून गाड्या चोरायच्या आणि नंतर त्याच गाड्या दरोडे आणि जबरी चोऱ्यांसाठी वापरायच्या ही या टोळीची कार्यप्रणाली असल्याचे दिसून आले. पोलीसांनी मकोका अंतर्गत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते.गेली 15 वर्ष या खटल्याची सुनावणी सुरु होती. या दरम्यान पहिल्या टप्प्यात तत्कालीन जिल्हा शासकीय अभियोक्त ॲड.प्रसाद पाटील, ॲड.भूषण साळवी आणि अखेरच्या टप्प्यात ॲड.संतोप पवार यांनी न्यायालयात कामकाज पाहीले.
जिनाह ऊर्फ जे.के.लैबी याची मुक्तता
सन 2015 मध्ये झालेल्या दरोड्याच्या या गुन्ह्यात कारागृहात असलेला मुख्य दरोडेखोर आरोपी तमिळनाडू मधील तुतुकोडी येथील जिनाह ऊर्फ जे.के.नैनामोहम्मद लैबी याने या खटल्याची लवकर सूनावणी व्हावी अशी मागणी करणारी याचीका आपल्या वकीलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावरिल सुनावणीअंती हा खटला सत्वर चालविण्याचे निर्देष सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार या खटल्याची सूनावणी घेण्यात आली.
आज या खटल्याची निकाल येथील न्यायालयाने दिला. दरम्यान जिनाह ऊर्फ जे.के.नैनामोहम्मद लैबी हा गेली सात वर्ष ,सहा महिने कारागृहातच असल्याने त्याची शिक्षा भोगून झाली असल्याने न्यायालयाने त्यांस आज मुक्त केले असल्याचे जिल्हा शासकीय अभियोक्त ॲड.संतोष पवार यांनी सांगीतले.