पाली ः सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात बिबट्याची दहशत आता शिगेला पोहोचली आहे. मध्यरात्री बिबट्याने थेट गावात शिरकाव करत एका ग्रामस्थाला दर्शन दिल्याने संपूर्ण गाव भीतीच्या छायेत आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी पिल्लांसह मादी दिसली असतानाच आता एकटा फिरणारा बिबट्या दिसल्याने परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा संचार असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पाच्छापूर येथील ग्रामस्थ सहदेव दिघे हे आपल्या घराबाहेर बसलेले असताना, समोरून रस्त्यावरून बिबट्या चालत येत असल्याचे त्यांना दिसले. बिबट्याला इतक्या जवळ पाहून दिघे यांची पळता भुई थोडी झाली. ते तातडीने घरामध्ये शिरले आणि स्वतःला सुरक्षित करून घेतले. यावेळी गावातील कुत्र्यांनी एकच गोंधळ घातल्याने बिबट्या अंधारात गायब झाला. या घटनेमुळे पाच्छापूर परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
वनविभागाकडून गस्त वाढवण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी मंगळवारीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या गंभीर परिस्थितीची कल्पना दिली. त्यावर वनविभागाने प्रतिसाद देत गावात रात्रीची गस्त अधिक वाढवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
पिल्ले असल्याने धोका वाढला! बिबट्याची पिल्ले सोबत असल्याने मादी बिबट्या अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतात जाणारे मजूर, शेतकरी आणि शाळेत जाणारी मुले यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांचे शिष्टमंडळ आता प्रत्यक्ष वन विभागाच्या कार्यालयात जाऊन ठोस उपाययोजनेची मागणी करणार आहे.
एकापेक्षा अधिक बिबट्यांचा वावर?
दोन दिवसांपूर्वी याच परिसरात मादी बिबट्या आपल्या दोन ते तीन पिल्लांसह रस्त्यावर दिसली होती. मात्र, दिसलेला बिबट्या एकटाच असल्याने तो नर असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. “जर मादी पिल्लांसह आहे आणि हा वेगळा बिबट्या दिसत असेल, तर गावात किमान दोन किंवा तीन बिबटे फिरत असावेत,“ अशी भीती ग्रामपंचायत सदस्य उमेश तांबट यांनी व्यक्त केली आहे.
आम्ही वनविभागाला सर्व परिस्थिती सांगितली आहे. गावात आता दिवसाही फिरणे मुश्कील झाले आहे. गावात केवळ गस्त न वाढवता वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून किंवा योग्य उपाययोजना करून येथील ग्रामस्थांना या दहशतीतून मुक्त करावे.उमेश तांबट, ग्रामपंचायत सदस्य, पाच्छापूर