Raigad ZP Elections : पनवेलमध्ये शेकाप -भाजपत थेट लढत

ग्रामीण भागातील बालेकिल्ल्यावर डोळा, आता उत्सुकता माघारीची
Raigad Zilla Parishad elections
रायगड जिल्हा परिषदPudhari News Network
Published on
Updated on

पनवेल : विक्रम बाबर

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दीने निवडणूक रणधुमाळीला अधिकच धार आली आहे. जिल्हा परिषदेसाठी तब्बल 41 तर पंचायत समितीसाठी 83 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले आहे. 5 फेब्रुवारी रोजी पनवेलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर 21 जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या निवडणुकीत पनवेल तालुक्यात खरी आणि निर्णायक लढत भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. ग्रामीण भागात अन्य पक्षांची ताकद तुलनेने कमी असल्याने ही निवडणूक प्रत्यक्षात भाजप विरुद्ध शेकाप अशीच रंगताना दिसत आहे. सध्याच्या राजकीय गणितानुसार पनवेलमधील आठ जिल्हा परिषदेच्या गणांपैकी दोन गणांवर भाजपचे वर्चस्व आहे, तर सहा गणांवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे.

Raigad Zilla Parishad elections
Thane : मुंब्रा हिरवा करीन वक्तव्य महागात पडणार

याचबरोबर पंचायत समितीच्या सोळा गणांमध्ये भाजपकडे सहा, काँग्रेसकडे तीन आणि शेकापकडे सात गणांचे प्रतिनिधित्व आहे. ही आकडेवारी पाहता सध्या तरी शेकापचे पारडे जड असले, तरी भाजपने या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

विशेष म्हणजे, ग्रामीण भाग हा शेतकरी कामगार पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. अनेक दशकांपासून या भागात शेकापची मजबूत पकड राहिली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आणि स्थानिक प्रश्नांवर भाजपने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हा बालेकिल्ला हळूहळू ढासळताना दिसत आहे.

Raigad Zilla Parishad elections
Thane civic politics : अपक्ष नगरसेविका प्रमिला केणींचा शिवसेनेला पाठिंबा

पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर भाजप ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून, याच मुद्द्यांवर शेकापची सत्ता खेचून आणण्याचा डाव आखला जात असल्याची चर्चा आहे.

पारंपरिक वोटबँकेवर नजर

शेतकरी कामगार पक्षही ही निवडणूक प्रतिष्ठेची मानत असून, ग्रामीण भागातील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचे जाळे आणि पारंपरिक मतदार यांच्यावर भरोसा ठेवत शेकाप भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत प्रचार अधिक आक्रमक होण्याची शक्यता असून, आरोपप्रत्यारोपांची राजकीय धगही वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news