सुधागडात पावसामुळे घरांचे,महाविद्यालयाचे पत्रे उडाले  pudhari photo
रायगड

Sudhagad rain damage : सुधागडात पावसामुळे घरांचे,महाविद्यालयाचे पत्रे उडाले

झाडे उन्मळून पडल्याने, विजेच्या तारा तुटल्या

पुढारी वृत्तसेवा

सुधागड : संतोष उतेकर

पाली शहरासह सुधागड तालुक्याला शनिवारी दुपारी विजांचा कडकडात व ढगांच्या गडगडाटासह आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या नैसर्गिक संकटामुळे शहरात अनेक झाडांची पडझड झाली. तसेच विजेचे खांब वाकले विद्युत तारा तुटल्या. घरांचे व महाविद्यालयाचे पत्रे उडाले व इतरही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, पाली बस स्टँड ते तहसील कार्यालय या मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड उन्मळून पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन रस्ता बंद झाला होता. येथील जे एन पालीवाला महाविद्यालयाचे पत्रे उडाले, भेरव येथील घरांचे पत्रे उडाले.

पाली खोपोली राज्य महामार्गावर चिवे गावाजवळ विजेचा मोठा खांब वाकल्यामुळे विजेच्या तारा रस्त्यावर खाली लोंबकळत होत्या. त्यामुळे वाहतूक संथ झाली होती. याच मार्गावर खुरावले फाट्याजवळ मोठे होर्डिंग पडले सुदैवाने खाली कोण नव्हते म्हणून जीवित हानी टळली. मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी अशा प्रकारे अनधिकृत होर्डिंग संदर्भात संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला.

झाप गावाजवळील मोठ्या वटवृक्षाचा अर्धा भाग कोसळला त्यामुळे येथील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. टेंभी वसाहत येथे काही घरांचे पत्रे उडवले. बल्लाळेश्वर नगर परिसरातही झाड कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या. वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. दुपारी साडेतीन नंतर पावसाने उसंत घेतल्यावरकाम युद्धपातळीवर सुरू झाले. कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती दुपारपर्यंत आली नाही.

आंबाबागायतदारांचे अतोनात नुकसान

सध्या आंब्याचा हंगाम असताना या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे आंबे गळून पडले असून बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य अमित निंबाळकर यांनी सांगितले, आपत्ती व्यवस्थापन टीमने तातडीने धाव घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शहरात इतर ठिकाणीही नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, नुकसानग्रस्तांना मदत मिळवण्यासाठी पंचनामे करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT