

कमलाकर होवाळ
माणगाव: गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या तडाख्याने होरपळलेल्या माणगाव तालुक्यावर शनिवारी दुपारी अचानक वादळी पावसाने आसूड ओढले. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करताच क्षणार्धात संपूर्ण परिसरात वादळी पाऊस कोसळला. विजेच्या कडकडाटासह थैमान घालणाऱ्या या अवकाळी पावसाने तब्बल दीड तास तालुक्याला झोडपून काढले. या अनपेक्षित संकटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले, तर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.
वादळी पावसाच्या तडाख्यात वीजपुरवठा दरम्यानच्या काळात खंडित झाला. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अचानक आलेल्या या संकटाने सर्वसामान्य नागरिकांची पूर्णपणे धांदल उडाली. तालुक्यातील प्रमुख बाजार पेठही या पावसामुळे ठप्प झाली. व्यापारी व ग्राहक दोघेही आडोसा शोधत पांगले.
दुकाने, हातगाड्या व उघड्यावरील व्यवसायांचेही नुकसान झाले. वादळी पावसामुळे तालुक्यात नेमके किती नुकसान झाले याची सविस्तर माहिती मात्र उशिरा पर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झाली नव्हती. विशेष म्हणजे हा पाऊस केवळ शनिवारपुरताच मर्यादित नव्हता. माणगाव तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सलग पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी दोघेही चिंताग्रस्त झाले आहेत.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; भात व आंबा पिकांचे नुकसान या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो तालुक्यातील शेतकरी वर्गाला पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने रब्बी हंगामातील भात पीक अजूनही तालुक्याच्या विविध भागांत शेतात उभे आहे. वादळी पावसाच्या तडाख्याने काही ठिकाणी हे उभे भात पीक जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे.
त्यातच आधीच कर्जाच्या ओझ्या खाली दबलेला आणि मेटाकुटीला आलेला शेतकरी या संकटाने पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाला आहे. एवढ्यावरच न थांबता, हंगामाच्या अखेरीस उरलेल्या आंबा पिकाचेही या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरीही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून, या दुहेरी संकटाने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत शेतकऱ्यांची मागणी संकटग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. निसर्गाच्या लहरीपणाने वारंवार होणाऱ्या नुकसानी मुळे त्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा तालुक्यातून व्यक्त होत आहे.