Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी

वैभववाडी तालुक्यात वादळामुळे घरे, गोठ्यांचे मोठे नुकसान
Sindhudurg Rain
सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या तापमान वाढीमुळे उकाड्याने त्रस्त जिल्हावासीयांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. गुरुवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास सह्याद्री पट्ट्यासह अनेक भागांत वादळी वार्‍यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. वैभववाडी तालुक्यात चक्रीवादळसदृश्य पाऊस झाला. घरे, गोठे यांची छप्परे उडाल्याने नुकसान झाले, तर काही ठिकाणी झाडे मोडून पडल्याने घरांसह वीज यंत्रणेचे नुकसान झाले. देवगड बाजारपेठ रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांची आणि व्यापार्‍यांची एकच तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडांची पडझड होऊन विद्युतपुरवठा खंडित झाला. हवामान खात्‍याने सिंधुदुर्गात वादळीवार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्‍यानुसार गुरुवारी सायंकाळी ढग दाटून आले होते. सोसाट्याच्या वार्‍यासह पावसास सुरुवात झाली. सह्याद्री पट्ट्यात वार्‍याचा वेग अधिक होता. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात सायंकाळी सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस झाला. पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस राहील, असा इशारा हवामान खात्‍याने दिला आहे.

या भागांमध्ये बसला अवकाळी पावसाचा फटका

चक्री वादळी पावसामुळे वैभववाडी तालुक्यात आखवणे-भोम पुनर्वसन गावठाण येथे काही घरांच्या छपरांचे नुकसान झाले. मांगवली-राणेवाडी येथे गोठ्यावर आंब्याचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. नाधवडे येेथे एका घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले. कोकिसरे रेल्वे फाटक परिसरात वडाचे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने कोकिसरे मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली होती. ग्रामस्थांनी तत्परता दाखवत झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सध्या तालुक्यात आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असताना या वादळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मांगवली येथे वीज खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरापर्यंत संपूर्ण तालुक्यातील वीजपुरवठा खंडित होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news