Healthcare Crisis Pudhari
रायगड

Healthcare Crisis: सुधागडची आरोग्य व्यवस्था ‌‘व्हेंटिलेटर‌’वर; निधीअभावी ग्रामीण रुग्णालय रखडले

आदिवासी बांधवांची जीवघेणी परवड, नागरिकांचा जीव टांगणीला

पुढारी वृत्तसेवा

शरद निकुंभ

पाली : सुधागड तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे चित्र दिवसेंदिवस भयावह होत असून, संपूर्ण व्यवस्था अक्षरशः ‌‘व्हेंटिलेटर‌’वर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांशी आदिवासी लोकवस्ती असलेल्या या तालुक्यातील नागरिक पूर्णपणे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून असताना, आज त्याच केंद्रात मूलभूत सेवाही मिळेनाशा झाल्या आहेत. परिणामी, आजारपण म्हणजेच संकट आणि उपचार म्हणजेच संघर्ष, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात हलविण्यात आले आहे. मात्र ‌‘तात्पुरती‌’ व्यवस्था कायमस्वरूपी ठरत चालली असून, येथे केवळ ओपीडीपुरतीच सेवा मर्यादित राहिली आहे. आपत्कालीन उपचार, प्रसूती, तपासण्या, बेड सुविधा या सर्व अत्यावश्यक गोष्टी जागे अभावी नाहीत.

यामुळे आदिवासी बांधव, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. अपघातग्रस्त, गंभीर आजाराचे रुग्ण किंवा प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना तातडीने रोहा, अलिबाग किंवा मुंबई गाठावी लागते. या धावपळीत वेळ, पैसा आणि कधी कधी रुग्णाच्या जीवावर संकटे येत आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित तळेकर यांनी सांगितले की, “तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेली जागा अत्यंत कमी आहे. येथे बेडची व्यवस्था नाही, तसेच बाळंतपण करणे शक्य नाही. त्यामुळे आम्हाला रुग्णांना अलिबाग येथे पाठवावे लागते.” अत्यंत क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली असेल तर आपण इथे बाळंतपण करतो. असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. ‌‘उपचार‌’ ऐवजी ‌‘रेफर‌’ हेच एकमेव उत्तर रुग्णांना मिळत आहे.

गरीब व आदिवासी कुटुंबांना खासगी रुग्णालयांचा महागडा पर्याय स्वीकारावा लागत असून, अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे, केवळ कागदोपत्री कामे पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात रुग्णालय सुरू होण्यासाठी अजून कोट्यवधींचा निधी आणि किमान सहा महिने लागणार आहेत. तोपर्यंत सुधागडकरांनी आजारपण सहन करायचे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांचे जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण रुग्णालय हे सुधागड तालुक्यासाठी जीवनदायिनी ठरणार असताना, त्याच प्रकल्पाकडे होत असलेले दुर्लक्ष हे अत्यंत संतापजनक आहे. तातडीने निधी मंजूर करून काम पूर्ण करावे आणि आरोग्य सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

सुधागडसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात आरोग्य सेवा ही चैनीची गोष्ट नसून मूलभूत गरज आहे. मात्र आज या गरजेकडे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक आहे. “आजारी पडणे हीच आमची चूक आहे का?” असा हळवा पण थेट प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारला जात आहे.लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक विलंब हा कुणाच्या तरी आयुष्याशी जोडलेला आहे.सध्या तरी एकच प्रश्न आहे की सुधागडच्या रुग्णांना अजून किती दिवस ग्रामीण रुग्णालययाची ‌‘वाट‌’ पाहावी लागणार?

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप इमारत हस्तांतरित करण्यात आलेली नसल्यामुळे पुढील प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला आवश्यक यंत्रसामग्री बसविणे व सेवा सुरू करणे शक्य होत नाही.
- निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक,अलिबाग
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असले तरी फायर फायटिंग सिस्टीम, डी.जी. सेट, स्ट्रीट लाईट्स व इतर विद्युत कामे अपूर्ण आहेत.या कामांसाठी सुमारे 5 ते 6 कोटी रुपयांचा वाढीव निधी प्रस्तावित असून, त्याशिवाय कंपाउंड वॉल, अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था आणि कर्मचारी निवासस्थानांसाठी आणखी आठ कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी मंजूर झाल्यास सहा महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- दिनेश पार्टे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग पाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT