महाड ः महाड शहरात भटकी कुत्री व कबुतर यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांच्यामुळे सामन्य नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे. महाड मधील दशानेमा गुजराती समाजाच्या वतीने महाडचे नगराध्यक्ष सुनिल कविस्कर यांना दिलेल्या निवेदनातून भटकी कुत्री व कबुतर यांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधून त्यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.
महाड कोकण विशानेमा गुजराती मंडळ यांच्या मार्फत पालिकेला दिलेल्या निवेदनात शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची व कबूतरांची संख्या नियंत्रण बाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन व सामान्य नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता याचा विचार करता यावर उपाययोजन गरजेचे आहे असे म्हटले आहे.
कबूतरांमुळे फुफ्फुसांच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. या आजारात शरीरातील प्रतिकारशक्ती कबूतरांच्या विष्ठेतील अँटिजन्सना अतिसंवेदनशील प्रतिसाद देतात, ज्यामुळे फुफ्फुसांच्या टिश्यूजवर आजाराचा ताण निर्माण होतो व दीर्घकाळासाठी फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते.काही प्रकरणांमध्ये रोग पूर्णपणे बरा होत नाही आणि आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर उपचार/स्टिरॉइडस गरजेचे असतात. तर भटक्या कुत्र्यांमुळे रेबीजचे धोके व संसर्गजन्य आजार याबद्दलही नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
रेबीज संक्रमित चाव्यामुळे गंभीर परिणाम व मृत्यू पण झालेले आहेत ही घटना देशभरात नोंदली गेली आहे. या दोन्ही गोष्टीसाठी उपाययोजनासाठी माननीय न्यायालय यांनी पण निकाल दिला आहे, तरी महाड नगरपरिषदेमार्फत याबाबत उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करीत भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण व लसीकरण मोहिम प्रभावी करणे, सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना दाणे टाकण्यास बंदी व कठोर अंमलबजावणी करावी, सार्वजनिक इमारतींवर कबूतर रोखण्याचे नेट/स्पाईक्स बसवण्याचे प्रोत्साहन द्यावे व नागरिकांमध्ये जनजागृती व सुरक्षिततेबाबत माहिती मोहीम राबवावी असे म्हटले आहे.
सदर निवेदन रोहन मोहन शेठ, अध्यक्ष, कोकण विशानेमा गुजराती युवा मंच, सैऊस सुभाष शेठ ,अध्यक्ष महाड विशानेमा गुजराती युवा मंडळ, पंकज मेहता, कोकण विशानेमा गुजराती युवा मंच यांच्या वतीने देण्यात आले आहे.