रेवदंडा, ः बुधवार 28 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील चौल गावांतील टेकाळकर आळीतील घरात एकट्याच राहाणाऱ्या सत्त्तर वर्षीय मंदा प्रमोद म्हात्रे यांचा निर्घृणपणे खून करुन अंगावरील सोन्याचे दागीने चोरुन फरार झाल्या चार आरोपींपैकी तीघांना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यांतील जाट देवळा गावांतून तर एकाला पेण येथे अटक करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे.
अवघ्या 48 तासांच्या आत रायगड जिल्हा पोलीसांनी छडा लावलेल्या या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महादेव उर्फ शिवा राधाकिसन ढोबळे (वय 25) हा मृत मंदा प्रमोद म्हात्रे यांचा जावई असून त्यांने आपल्या तीघा साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुख्य आरोपी जावई मुख्य आरोपी महादेव उर्फ शिवा राधाकिसन ढोबळे ,अशोक अजिनाथ भोसले (वय-19), गणेश उत्त्तम पंडागळे (वय-25) या तिघांच्या रायगड पोलीसांच्या विशेष तपास पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यांतील जाट देवळा गावात पोहोचून मुस्क्या आवळल्या आहेत. तर मुळ माणिक दवंडी ,पाथर्डी येथे राहाणार चौथा आरोपी शुभम एकनाथ पवार(वय-23) यास रायगड जिल्ह्यल पेण शहरातून अटक करण्यात आली आहे.
बुधवारी गुन्हा घडल्यावर रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक अभिजित शिवथऱे, अलिबाग उप विभागीय पोलीस अधिकारी माया मोरे आणि रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरिक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पोलीस तपास पथके अनूक्रमे सहा.पो.निरिक्षक भास्कर , .पो.नि.मानसींग पाटील व स.पो.नि.भैरु जाधव यांच्या नेतृत्वाखाली करुन तपासास प्रारंभ करण्यात आला.
तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपुर्ण तपास या तीनही पथकांनी अत्यल्प वेळात करुन आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना 48 तासांच्या आत गजाआड करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान मंदा प्रमोद म्हात्रे यांचा खून नेमक्या कोणत्या कारणास्तव करण्यात आला आणि चोरलेले सोन्याचे दागीने हस्तगत करण्याकरिता पूढील तपास भैरु जाधव हे करित आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यांतील जाट देवळा गावांतून अटक केलेले आरोपी महादेव उर्फ शिवा राधाकिसन ढोबळे ,अशोक अजिनाथ भोसले , गणेश उत्त्तम पंडागळे यांच्यासह रायगड पोलीस दलाच्या विशेष तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी.