

पनवेल : उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करून कारवाई करण्यात आली. स्थळपाहणी अहवालानुसार एकूण 34 बांधकामस्थळांवर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर प्रकल्पांचे काम तात्काळ थांबविण्यात आले आहे.
संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्यानंतरही काही व्यवसायिकांनी अपेक्षित कार्यवाही न केल्याचे दिसून आले. त्यानंतर पथकाने पुन्हा एकदा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न करणे, बांधकाम साहित्य खुले ठेवणे, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या साहित्यावर नियमाप्रमाने पाणी न शिंपडणे, वाहन स्वच्छता न करणे, तसेच ब्लास्टिंग करतानाच्या मानक कार्यपद्धतीचे पालन न करणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आल्या. संबंधितांना तात्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून, उल्लंघन सुरूच राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
स्थळपाहणी अहवालानुसार आढळलेल्या बाबी
विकासकांनी बांधकाम प्रकल्पांच्या भोवती किमान 25 फूट उंचीचे धातूचे पत्रे लावण्यात आल्याचे दिसून येत नाही.,बांधकाम चालू असणाऱ्या सर्व इमारतींच्या भोवती ओल्या हिरव्या कापडाने / ओल्या तागाच्या कापडाने / ताडपत्रीने बंदिस्त करण्यात आल्याचे दिसून येत नाही.,बांधकामच्या ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर / स्मॉग गन द्वारे सतत फवारणी करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
बांधकाम जागेवरील हवेमध्ये प्रदूषण करणाऱ्या भंगार / पाडकाम साहित्यावर पाणी शिंपडण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकाम साहित्य तसेच रेडी मिक्स काँक्रीट वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे वरच्या बाजूने व सर्व बाजूनी पूर्ण झाकलेली असावीत. वाहनातून कोणत्याही प्रकारे गळती होऊ नये तसेच ओव्हरलोड होऊ नये, ह्याची दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. ,
बांधकामाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स लावणे बंधनकारक असेल, प्रदूषणाची पातळी ओलांडणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रोलिंग, सोईग आणि ट्रिमिंग ची कामे बंदिस्त भागात करावी व हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर वापरून सतत फॉगिंग करण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकामाच्या ठिकाणी असणारी माती, वाळू, बांधकाम साहित्य हे बंदिस्त भागामध्ये साठविण्यात आल्याचे दिसून येत नाही.
विभागनिहाय झालेली कारवाई
कळंबोली विभाग -10 बांधकाम प्रकल्प
कामोठे विभाग -09 बांधकाम प्रकल्प
नवीन पनवेल / पनवेल विभाग
15 बांधकाम प्रकल्प
एकूण : 34 बांधकाम प्रकल्पांवर कारवाई