म्हसळा : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, बोर्ली, दिवेआगर परिसरात पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीमुळे व वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून दोन दिवसांपूर्वी घडलेली दुर्दैवी अपघाताची घटना अत्यंत चिंताजनक ठरली आहे. या पार्श्वभूमीवर म्हसळा शहरातील नागरिकांनी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
बोर्ली, दिवेआगर हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत असतात. मात्र पर्यटकांकडून वाहतुकीचे नियम न पाळणे, अतिवेगाने व बेदरकार वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच रस्त्यावरील अपुरी सुरक्षितता यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जीवित व मालमत्तेची सातत्याने हानी होत आहे.
सदरचे निवेदन म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांना देण्यात आले.यावेळी मुसद्दिक इनामदार,संजय खांबेटे,उदय कळस,दिपल शिर्के,नंदू शिर्के,सलीम बागकर,शाहिद जंजीरकर,रियाज घराडे,दिलीप करमरकर,सरफराज दर्जी,निहाल पेणकर,शगुप्ता जहांगीर आदी मान्यवर उपस्थित होते.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविणे, वाहतूक नियंत्रणासाठी नियमित तपासणी मोहीम (चेकिंग ड्राइव्ह) राबविणे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक व आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविणे,पर्यटकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना देणे तसेच रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढविणे अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशी ठाम मागणी म्हसळा शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.