shivrajyabhishek 2026 Pudhari
रायगड

Heavy Vehicle Ban: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाच जून ते सहा जून दरम्यान जड-अवजड वाहतुकीला बंदी

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेश; शिवप्रेमींचा प्रवास होणार सुखकर

पुढारी वृत्तसेवा

रायगड: श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पाच जून रोजी दुपारी चार ते सहा जून रोजी रात्री दहा वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये संबंधित विभागातील महामार्गांवर जड अवजड वाहतुकीस बंदीचे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडीपर्यंत तसेच माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूकबंदी अधिसूचना जारी केली आहे.

श्री शिवराज्याभिषेक सोहळा-2026 हा कार्यक्रम पाच जून व सहा जून रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई वैगेरे ठिकाणांहून लाखोंच्या संख्येने श्री शिवभक्त हे आपआपली वाहने घेवून येत असतात. तसेच या कार्यक्रमाकरीता आयोजकांच्या सामानाची वाहने देखील मोठ्या प्रमाणात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येत असतात.

या सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त हे रायगड किल्ला येथे माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला असे जाण्याचे एकूण तीन मार्ग आहेत. या मार्गावरून शिवभक्त हे आपआपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येत असतात.

तसेच शासकीय यंत्रणा यांच्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. सदर शिवभक्तांची वाहने ही मुंबई-गोवा महामार्गावरून कशेडी घाट ते महाड, तसेच वाकणफाटा-नागोठणे-कोलाड-माणगांव-महाड या महामार्गावरून येत असतात.

त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असते अशावेळी अपघात, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कार्यकमाच्या वेळी कोठे ही वाहतुक कोंडी निर्माण होवू नये व श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हाधिकारी जावळे यांनी वाहतूक बंदी जाहीर केली आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू

ही वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका या वाहनांना लागू राहणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT