

खारघर: खारघर उपनगरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांना दररोज हजारो रुपये खर्च करून टँकरचे पाणी खरेदी करावे लागत आहे. कोट्यवधी रुपये मोजून सदनिका खरेदी केलेल्या नागरिकांवर मूलभूत पाणीपुरवठ्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली असल्याने सिडकोच्या नियोजनापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
धरणाने तळ गाठला तसेच एल निनो या नव्या संकटांचा आधार घेत पनवेलमधील सर्वच उपनगरांमध्ये सरकारी विभागांनी 10 टक्के पाणी कपात सुरू केली असली तरी ज्या मंडळींना अनेक वर्षे उन्हाळ्यासह पावसाळ्यातही अपु-या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे अशा रहिवाशांना यंदाही पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नळांना दिवसातून केवळ काही मिनिटेच पाणी येत असल्याने दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. परिणामी, टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
पाणीटंचाईवर उपाय म्हणून सोसायटीने बोअरवेलचा पर्यायही वापरून पाहिला. मात्र भूजलाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याने बोअरवेलची योजना फसली. त्यामुळे नागरिकांसाठी टँकर हेच प्रमुख साधन बनले आहे.
खारघर येथील रहिवाशांच्या मते, पाणीपुरवठ्याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी सिडकोच्या कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. ऑनलाइन तक्रार निवारण किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थेट पाठपुरावा करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
दिवसाचा टँकरचा खर्च तीन हजार रुपये !
अरिहंत अनाया सोसायटीमधील पदाधिकारी विशाल विक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी टँकरसाठी वार्षिक सुमारे 15 लाख रुपये खर्च होत होता. मागील वर्षी हा खर्च 30 लाख रुपयांवर पोहोचला. सरकारची निवडणूक संपल्यावर हा खर्च कमी होईल अशी अपेक्षा होती.
मात्र तो खर्च दुपटीवर पोहोचला. यंदा पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्याने दररोज पाच टँकर मागवावे लागत असून त्यासाठी दिवसाला सुमारे 2,800 ते 3,000 रुपये प्रति टँकर खर्च होत आहे.नियमित देखभाल शुल्काव्यतिरिक्त प्रत्येक कुटुंबाला पाण्यासाठी स्वतंत्र आर्थिक भार सहन करावा लागत आहे.