Cyber Fraud
रायगड : मनी लाँडरिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्टची भीती दाखवत ज्येष्ठाला सहा कोटी 29 लाखांचा गंडा घालणार्या ठगाला सायबर पोलिसांनी पनवेल येथे सापळा रचून ताब्यात घेतले. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (28, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
आरोपी वाजंत्री याने पुण्यातील एका ज्येष्ठाला 9 ते 19 नोव्हेंबर 2024 दरम्यान व्हॉटस्अप क्रमांकावरून फोन करून पोलिस असल्याची बतावणी केली. तसेच त्यांचा विश्वास संपादन करून मनी लाँडरिंगची केस असल्याचे सांगितले. त्यानंतर चौकशीच्या बहाण्याने डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठाला पैसे पाठविण्यास सांगितले. ज्येष्ठाने त्याला तब्बल सहा कोटी 29 लाख रुपये पाठविले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिसांकडून आरोपीच्या बँक खात्याचा तपास सुरू असताना 11 नोव्हेंबर 2024 रोजी 20 लाखांची रक्कम फिर्यादीच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आरोपीने 90 लाख आणि 20 लाख रुपयांची एफडी केली. हे बँक खाते कोकबन येथील श्री धावीर कन्स्ट्रक्शन यांचे असल्याचे उघड झाले.तर आरोपी हे बांधकाम व्यावसायिक असल्याचे समोर आले.
सायबर पोलिसांचे पथक आरोपी वाजंत्री, त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहचले. मात्र आरोपी साथीदारासह पसार झाला होता. आरोपी पनवेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. सायबर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाजंत्री याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार अद्याप फरार आहे.
आरोपी तुषार वाजंत्री याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांत नॅशनल सायबर पोर्टलवर एकूण पाच तक्रारी आहेत. या पाच गुन्ह्यांत वाजंत्री याचा सहभाग असल्याचे उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.