

Land scam investigation
नंदुरबार : येथील एका मंडळ अधिकाऱ्यांशी संबंधित कार्यालयात उपविभागीय तथा प्रांत अधिकारी अंजली शर्मा यांनी स्वतः छापा मारून तपासणी केली. जमीन प्रकरणांशी संबंधित तक्रारीवरून ही छापेमारी झाल्याचे म्हटले जात असून महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे खोट्या नोंदी बनवून नंदुरबार शहरातील तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी जमिनी लाटण्याचा गैरप्रकार घडवला गेला आहे. अनेक वर्षापासून त्याच्या तक्रारी आहेत. राजकारणातील बड्या हस्तीची साखळी संलग्न असल्यामुळे कधीही त्याची खरोखरची तपासणी झालेली नाही, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.
मंदिर संस्थांच्या जमिनी, गावठाण जमिनी तसेच आरक्षित जमिनी याच्याशी संबंधित ही प्रकरणे असून यातील अनेक वादग्रस्त जमीन प्रकरणांच्या केंद्रस्थानी निवृत्त असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्याचे नाव सातत्याने घेतले जाते. प्रांत अधिकारी यांनी छापेमारी करून केलेली तपासणी या प्रकरणाशी संबंधित आहे काय? हा प्रश्न चर्चेत आला आहे व मोठा उत्सुकतेचा विषय बनला आहे.
दरम्यान छापा टाकण्यात आला त्या कार्यालयात अनेक वर्षांपूर्वीचे बरेच जुने रेकॉर्ड हाती लागले असून काही आक्षेपार्य आढळल्यास येत्या तीन दिवसात गुन्हा नोंदवला जाऊ शकतो; असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तथापि कोणत्या जमीन प्रकरणाच्या तक्रारीवरून ही छापेमारी झाली हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता दैनिक पुढारीशी बोलताना प्रांत अधिकारी अंजली शर्मा यांनी सांगितले की, छापा टाकून तपासणी केली हे खरे आहे. एका जमीन प्रकरणाशी संबंधित तक्रारीवरून ही तपासणी करण्यात आली. आता हाती आलेल्या रेकॉर्डच्या तपासणीत काही गैर आढळल्यास पुढील कारवाईची दिशा ठरेल, असेही शर्मा यांनी सांगितले.