Roshni Pardhi Women Cricketer
महाड : महाडच्या रोशनी पारधीची महाराष्ट्र राज्य महिला वरिष्ठ क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जिल्ह्यातील सर्व क्रिकेट प्रेमींसाठी ही अत्यंत आनंददायी बातमी असून यामुळे महाड सह रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास लिहिला गेला आहे.
मूळची महाडची राहणारी असणारी रोशनी पारधी हिचे आई-वडील हातगाडीवर कच्ची दाबेलीचा व्यवसाय करतात. मात्र हा व्यवसाय करताना आपल्या लाडक्या मुलीची क्रिकेट खेळण्याची असलेली आवड कुटुंबाची बेताची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन देखील आई-वडिलांनी तिच्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले. महाड मधील अनेक दानशूर व्यक्ती राजकीय नेत्यांनी तिच्या वाटचालीसाठी भरघोस मदत केली.
रोशनीने सर्वप्रथम महाराष्ट्राच्या 15 वर्षीय 17 वर्षीय संघात निवड झाल्यावर संघातर्फे खेळताना चमकदार कामगिरी करून राज्यातील क्रिकेट संघटनातील अधिकार्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे तिची 19 वर्षाखालील संघात निवड करण्यात आली. मात्र या संघातून तिची कामगिरी होण्यापूर्वीच तिची महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट वरिष्ठ संघात निवड करण्यात आली आहे.
या संघामध्ये एकूण 18 जणांचा समावेश करण्यात आला होता त्याच्यामधून 16 जणांची निवड करण्यात आली त्यामध्ये रोशनी पार्टीचा समावेश आहे. रोशनीचा समावेश महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघात करण्यात आला असला तरी तिचे आजचे वय पंधरा वर्षे आहे. हे लक्षात घेता तिच्या खेळाकडे बघूनच व भविष्यकालीन वाटचालीवरच लक्ष ठेवून निवड समितीने ही निवड केली असल्याचे बोलले जाते.
चिचकर यांच्याकडे मार्गदर्शन
महाड मधील एसबीसी क्रिकेट अकॅडमीच्या बशीर चिचकर यांच्याकडे लहानपणापासूनच रोशनीने क्रिकेटचा धडा गिरविला आहे . याच अकॅडमीमधील तिचे प्रशिक्षक आवेश चिंचकर यांनी तिला नेहमीच प्रोत्साहित करून तिला मदत केली महाड सारख्या तालुकास्तरावरून राज्य पातळीवरील संघात रोशनीची झालेली निवड ही येणार्या काळात भारतीय संघापर्यंत जाऊन पोहोचेल असा विश्वास महाड मधील क्रिकेट प्रवीण कडून व्यक्त होत असून तिच्या वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.