

कोलाड (रायगड) : विश्वास निकम
कोसळणारा धो धो पाऊस, तुफान पावसात एका महिलेच्या अंत्यविधीसाठी जमलेला जमाव, पावसामुळे चिता भिजू नये यासाठी चक्क मृतदेहासह चितेवर ताडपत्री धरुन केलेला अंत्यविधी... एखाद्या चित्रपटातील प्रसंगाला शोभेल असा दुर्दैवी प्रसंग नेहरूनगर बाईतवाडी, ता. रोहा येथील नागरिकांना आला. सन २०२३ मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यात स्मशानभूमीच्या झालेल्या दुरवस्थेमुळे येथील नागरिकांना उघड्यावरच असे अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.
मृत्यूनंतरचा प्रवास शांतमय वातावरणात व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही स्मशानभूमीच सुस्थितीत नसल्याने अनेकांना अशा खडतर वाटेवरुन या जगाचा निरोप घ्यावा लागतोय. त्यात नेहरूनगर बाईतवाडी गावातील स्मशानभूमीचा समावेश करावा लागले. २०२३ च्या चक्रीवादळात ही स्मशानभूमी उद्धवस्थ झाली आहे. या वादळवाऱ्यात लोखंडी पोल कोसळले, छप्पर उडाले, यामुळे स्मशानभूमीच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे बंद झाल्या. याला दोन वर्षे होऊन ही अद्याप ही प्रशासनाने स्मशानभूमीची कोणती दुरुस्त केली नाही. यामुळे शनिवारी झालेल्या तुफान पावसात एका महिलेच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या ग्रामस्थांना चिता भिजू नये म्हणून चितेवरती ताडपत्री बांधून अंत्यविधी करावे लागले. पावसामुळे उभे राहण्यासाठी जागा नाही. रस्ता नाही. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
लोकप्रतिनिधींचे मागणीकडे दुर्लक्ष
येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, यांना वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या परंतु प्रशासन गावातील मूलभूत गरजांकडे लक्ष देत नसून त्यांनी ग्रामस्थांना केराची टोपली दाखवली असल्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासनाने त्वरित स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, सुरक्षित रस्ता तयार करावा तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावा अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.