

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन घटिका जस जशी भरत आली आहे तसे विमानतळ नामकरण हालचाली वेग धरत आहेत. नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवंगत दि बा पाटील यांचे नाव नाही तर दिले तर विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही. त्यामुळे विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे म्हणून येत्या 6 ऑक्टोबर ला समस्त भूमिपुत्रांच्या वतीने एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी भूमिका घेण्यात आली आहे. याबाबत रविवारी कोपरखैराणे येथे बैठक पार पडली असून याच बैठकीत 6 ऑक्टोबरच्या मोर्चाचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात उशीर केला जात असून केंद्राकडून अजून अंतीम अधिसूचना काढली जात नाही. त्यामुळे येथील भूमिपुत्रांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून या आंदोलनाची आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांनी रविवारी कोपर खैरणे येथील शेतकरी समाज मंदिर मध्ये बैठकीचे आयोजन केले आहे होते. त्यावेळी सुरेश म्हात्रे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.यावेळी माजी खा.रामशेठ ठाकूर हे उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे देण्यात यावे अशी समस्त भूमिपुत्रांची मागणी असून तसा ठराव देखील राज्य सरकारने मंजुर करून केंद्र सरकार कडे पाठवला आहे. तर विमानतळाचे उद्घाटन आता येत्या 8 किंवा 9ऑक्टोबर ला होणार असून विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव असेल असे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचे म्हात्रे यांनी सांगीतले.
या मोर्चात सागरी जिल्ह्यातील जवळपास लाख भूमिपुत्र सामील असतील. मोर्चात सहभागी होण्यासाठी पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र संघटना आणि प्रतिनिधना याबाबत कळवण्यात आले आहे. अशी माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, यांच्या सह शेकडो भूमिपुत्र तसेच संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान,सध्या तरी पनवेल,उरण परिसरात विमानतळ नामकरणावरुन वातावरण चांगलेच पेटलेले आहे.सरकारने नामकरणाचे आधी जाहीर करुन मगच लोकार्पण करावे,अशी मागणी होत आहे.आ.प्रशांत ठाकूर यांनीही दिबांचेच नाव विमानतळाला दिले जाईल,दुसरे दिल्यास तात्काळ आमदारकीचा राजीनामा देईन,असे जाहीरही केलेले आहे.तर आम.महेश बालदी यांनीही दिबांच्या नावासाठी आम्ही आग्रहीच आहोत,अशी भूमिका घेतलेली आहे.सर्व पक्षीय नेते आता याच नावासाठी आग्रही आहेत.त्यामुळे सरकार नेमके काय नाव जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाव जाहीर केल्यास सत्कार,अन्यथा संघर्ष
प्रस्ताव केंद्राकडे असून त्यास तीन वर्ष होत आली तरी अद्याप त्यावर निर्णय घेतला जात नाही आणि असे असताना उद्घाटनाचा घाट घातला जात आहे. त्यामुळे केंद्राने जर उद्घाटना आधी विमानतळाला स्व. दिबा पाटील यांचे नाव जाहीर केले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, सत्कार करू आणि नाव जाहीर न करताच उद्घाटन केले तर संधर्ष अटळ आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे देण्याची अंमलबजावणी करावी म्हणून येत्या 6 ऑक्टोबरला विमानतळावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही सुरेश म्हात्रे यांनी जाहीर केले.