रोहे : महादेव सरसंबे
रोहा तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आगामी जिल्हा परिषद निवडणुकीकडे वळले आहे.येत्या 5 फेब्रुवारीला या निवडणुका होणार आहेत. तालुक्यातील, नागोठणे, आंबेवाडी, भुवनेश्वर व घोसाळे जिल्हा परिषद मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः घोसाळे जिल्हा परिषद मतदारसंघात ‘उमेदवार आयात’ होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून त्यामुळे स्थानिक इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. हा आयात उमेदवार कुठल्या पक्षा कडून येईल याची अद्याप स्पष्टता नाही. तर दुसरीकडे भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीकडे मातब्बर नेते मंडळी असल्याने कोणाला उमेदवारी मिळेल हे निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी कळून येईल.
आंबेवाडी जिल्हा परिषद गट व नागोठणे जिल्हा परिषद गटात इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, प्रत्येक गटात उमेदवारीसाठी स्पर्धा तीव्र होत चालली आहे. कोण उमेदवार ठरणार, कोणत्या पक्षाला किती बळ मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अप ), शिवसेना ( शिंदे गट ), शिवसेना ( ठाकरे ), शेतकरी कामगार पक्ष व भारतीय जनता पार्टी हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. याशिवाय आघाडी व युतीच्या शक्यतांवरही चर्चा सुरू असून, अंतिम समीकरणे काय असतील याबाबत उत्सुकता आहे.
सध्या तरी राष्ट्रवादी ( अप) शिवसेना ( शिंदे गट ) भारतीय जनता पार्टी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या गटाने आपल्या पक्षाचे जिल्हा परिषद निहाय मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे.
मागील निवडणुकीत वरसे जिल्हा परिषद गटातून आदिती तटकरे, चणेरा जिल्हा परिषद गटातून अस्वाद पाटील, आंबेवाडी जिल्हा परिषद गटातुन दयाराम पवार, नागोठणे जिल्हा परिषद गटातून किशोर जैन हे निवडुन आले होते. तर नागोठणे पंचायत समिती गणतून बिलाल बशीर कुरेशी, ऐनघर पंचायत समिती गणातून संजय भोसले, खांब पंचायत गणातून विना विनायक चितळकर, आंबेवाडी पंचायत समिती सिध्दी संजय राजीवले, धाटाव पंचायत समिती गणातून विजया विनोद पाशिलकर, वरसे पंचायत समिती गणातून राजश्री राजेंद्र पोकळे, खारगाव पंचायत समिती गणातून गुलाब धर्मा वाघमारे, विरजोली पंचायत समिती गणनातून रामचंद्र महादेव सकपाळ हे निवडून गेले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खा. सुनील तटकरे यांचा रोहा तालुका हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदा या बालेकिल्ल्यात विरोधक आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक सत्ता नाही, तर राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नगरपरिषद च्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अप ) नी घवघवीत यश मिळाल्याने चांगले वातावरण पक्षासाठी पहावयास मिळत आहे. एकूणच, रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक राजकीय हालचालींनी तापली असून, आगामी काळात घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.