

इलियास ढोकले
नाते: हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाचा गौरवशाली इतिहास आता अधिक भव्य आणि दिव्य स्वरूपात अनुभवता येणार आहे. रायगड प्राधिकरणातर्फे गडावर लवकरच देशातील पहिला '३६० डिग्री' (360°) भव्य लाईट अँड साऊंड शो सुरू होणार असून, शिवभक्तांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साकारण्यात येणारा हा शो तब्बल ४५ मिनिटांचा असेल. यामध्ये प्रकाश आणि ध्वनीच्या (Light and Sound) माध्यमातून शिवकाळातील महत्त्वाचे प्रसंग जिवंत केले जातील. भव्य बाजारपेठ, नगारखाना, शिवछत्रपतींची सदर, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी स्थळ या ऐतिहासिक वास्तू प्रकाशाने उजळून निघतील. मावळ्यांचे शौर्य आणि डोळे दिपवणारा 'शिवराज्याभिषेक सोहळा' प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
या बहुप्रतिक्षित प्रकल्पाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. छत्रपती संभाजीराजे यांनी १० जानेवारी रोजी गडाला प्रत्यक्ष भेट दिली. गडाचे जतन आणि संवर्धन करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, सोशल मीडियावरील टीकेला उत्तर देताना त्यांनी आवाहन केले की, "रायगड हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे केवळ सोशल मीडियावर टीका न करता थेट प्राधिकरणाकडे आपल्या सूचना किंवा तक्रारी मांडव्या."
या प्रकल्पाबाबत शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता असली तरी, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या (ASI) भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरातत्व विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव सूर्यास्तानंतर गडावर मुक्काम करण्यास मनाई केली आहे. मात्र, हा शो रात्रीच्या वेळी होणार असल्याने, शिवभक्तांच्या राहण्याची व्यवस्था आणि प्रवेशाबाबत पुरातत्व विभाग काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.