रोहा पालिकेची निवडणूक होणार चुरशीची  pudhari photo
रायगड

Roha municipal election : रोहा पालिकेची निवडणूक होणार चुरशीची

थेट नगराध्यक्षपदासाठी चर्चेला ऊत, इच्छुकांची मोर्चेबांधणी; खा.तटकरेंच्या चालीकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

रोहे ः महादेव सरसंबे

रोहा अष्टमी नगरपरिषदेचे आरक्षण सोडत झाल्यानंतर राजकीय घडामोडी रोहा शहरात चालू झाले आहेत. थेट नगराध्यक्षपदासाठी राजकीय चर्चेला जोर चढला आहे.पक्षाच्या महिला इच्छुकांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीत खा. सुनील तटकरे यांची ताकद वाढल्याने घरातील उमेदवार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खा. सुनील तटकरे नेहमीप्रमाणे राजकीय संभ्रमित वातावरण ठेवत शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता असल्याने थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल हे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. परंतु समीर शेडगे राष्ट्रवादीच्या गटात आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांना किती जागा मिळतील याची रोहेकरांना उत्सुकता असताना त्यांना जागा देण्यासाठी खा. सुनील तटकरे यांना मात्र राजकीय कसरत करावी लागणार आहे एवढे निश्चित. परंतु जुन्याचं काय हा ही प्रश्नचिन्ह कायम आहे .दरम्यान शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप कडूनही काही संभाव्य नावांची चर्चा सुरू आहे.

रोहा शहरात या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात सर्वच पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू असून त्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पक्षांतरांची लाट दिसून येत आहे. भाजप आता रोहा शहरात आपले पाय घट्ट रोवण्याच्या प्रयत्नात आहे.तर शिवसेना ( शिंदे गट ) कडूनही कार्यकर्त्यांची भरती सुरू आहे.

काही राष्ट्रवादी कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाल्याचे बोलले जात असून या बदलांचा परिणाम निकालावर किती होईल हे मतदानानंतरच स्पष्ट होईल.शिवसेना ( उबाठा ) यांचीही तालुक्यात ठोस ताकद असल्याने या निवडणुकीत बहुकोनी लढत होण्याची चिन्हे आहेत.दरम्यान काँग्रेस व शेकाप कोणत्या आघाडीकडे झुकणार हे निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे स्पष्ट होईल.

माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या कार्यकाळात रोहा अष्टमी शहरात मोठ्या प्रमाणावर विविध विकासकामे झाल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरातील शहरी सुविधा यांसारख्या कामांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लक्षणीय प्रगती झाल्याचे दिसून येते. मागील नगरसेवकांचे जनसंपर्क, माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळातील कामगिरी आणि विविध पक्षांतील गटबाजी या तिन्ही गोष्टी निकालावर थेट परिणाम करणार आहेत.

विरोधकांच्या आव्हानाबाबत औत्सुक्य

थेट नगराध्यक्ष पद आणि 20 सदस्य पदांसाठी यंदा निवडणूक होत आहे. यावर्षी तीन जागा वाढल्यामुळे पक्षांना कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे. रोहा तालुका पारंपरिकदृष्ट्‌‍या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. खा. सुनील तटकरे यांच्या या बालेकिल्ल्यावर विरोधक किती भक्कम आव्हान देऊ शकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 13 सदस्य निवडून आले होते.तर काँग्रेसचे एक, शिवसेना (उबाठा) चे एक आणि दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT