कर्जत : हेमंत देशमुख
कर्जत तालुक्यातील राजनाला सिंचनाखालील भात शेतीचे क्षेत्र काही प्रमाणात वाढले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. कर्जत तालुका हा भात शेतीसाठी ओळखला जातो. येथे पावसाच्या पाण्यावर तसेच राजनाला च्या पाण्यावर दुबारभात शेती केली जाते. मात्र मागील काही वर्षात अवकाळी पाऊस, शेतमजुरांची कमतरता तसेच अन्यकारणामुळे भात शेती काही प्रमाणात दुर्लक्षित झाली होती.
मात्र कर्जत कृषी विभागाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना भातशेतीचे महत्त्व अधोरेखित करत चांगले बियाणे, खते आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यामुळे यंदा राजनाला सिंचनाखालील भात शेतीचे क्षेत्र काही प्रमाणात वाढले असल्याचे कर्जत तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी भात शेती बरोबरच वांगी, मिरची, कारली, भेंडी, कलिंगड, टोमॅटो, दोडका, काकडी आदी फळभाज्यांचे सुद्धा उत्पादन घेतले आहे.
भात शेती बरोबरच आत्मा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026 या योजनेनुसार कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना नाचणी पीक प्रात्यक्षिक घटकासाठी नाचणी बियाणे सुद्धा उपलब्ध करून सुमारे 100 किलो नाचणी बियाणे शेतकऱ्यांच्या गटांना पुरविण्यात येणार आहेत. नाचणी ही पौष्टिक असल्याने नाचणीला चांगले मागणी असून भावही चांगला मिळत आहे. शेतजमीन उपलब्ध आहे अशांनी नाचणीचे पीक घ्यावे असे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
आधुनिक पद्धतीने शेती तसेच चांगले बियाणे आणि योग्य मार्गदर्शन केल्यामुळे यंदा भात शेतीच्या उत्पादनाचे क्षेत्र वाढले आहे. तसेच शेतकऱ्यांनी भात शेतीवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.राजाराम शिंदे, तालुका कृषी अधिकारी, कर्जत
भात शेती बरोबरच भाजीपाल्याचेही उत्पादन घेतल्यास आर्थिक हातभार लागण्यास अधिक मदत होते तसेच ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे, त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास नक्कीच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो.अनिल देशमुख, गौरकामत, शेतकरी
2024 - 25 उन्हाळी हंगाम राजनाला सिंचन भात शेती शेत्र 309.8 हेक्टर तर
2025 -26 उन्हाळी हंगाम राजनाला सिंचन भात शेती वाढीव क्षेत्र 486.4 हेक्टर