

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील खरीप हंगाम नियोजन बैठक प्रांताधिकारी कार्यालयातील सभागृहात आ. महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, पिकांवरील रोग व कीड नियंत्रणात ठेवणे, मातीतील ओलावा व पोषकतत्त्वांचे अचूक परीक्षण करणे यासाठी आधारित यंत्रणा उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
खरीप हंगाम नियोजन बैठक विविध महत्वाचे निर्णय झाले. यावेळी बोलताना आ. महेश शिंदे यांनी सांगितले की, आमदार निधीतून स्टेशन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. तंत्रज्ञानामुळे एका गावातील रोग दुसऱ्या गावात पसरण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवता येईल. तसेच पिकांना किती पाणी द्यावे, जमिनीतील मॉइश्चर किती आहे, पोटॅश किती प्रमाणात द्यावे, कोणती औषधे वापरावीत याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कोरेगाव तालुका 98 टक्के सिंचनाखाली आणण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. नाबार्डच्या निधीतून स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत रामोशवाडी ते भाडळे खोरे तसेच देऊर परिसरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी तालुक्यात फक्त 6 हजार हेक्टर ऊस होता, तो आज 13 हजार हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन वर्षांत हा आकडा 50 हजार हेक्टरपर्यंत नेण्याचा मानस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी धेंचा, ताग यांसारख्या हरित खतांच्या बियाण्यांचे उत्पादन करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढून उत्पादनक्षमतेत वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
यावेळी एल निनोच्या संभाव्य परिणामाबाबत शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. 75 ते 100 मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, असे आवाहन आ. महेश शिंदे यांनी केले. तसेच बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याची सोपी पद्धत कृषी विभागाकडून कार्यशाळांद्वारे शिकविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी आणि तालुक्यातील विविध शेतकरी उपस्थित होते.