Raigad Infrastructure Project pudhari photo
रायगड

Raigad News : रेवदंडा-साळाव खाडीवरील पुलाच्या कामाला वेग

रेवस-रेड्डी कोस्टल हायवेचा महत्त्वाचा साकारतोय दुवा; पिलर उभारणीचे काम युद्धपातळीवर

पुढारी वृत्तसेवा

रेवदंडा : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा ते साळाव दरम्यान कुंडलिका खाडीवर उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित खाडी पुलाच्या कामाला आता वेग आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारण्यात येणारा हा पूल रेवस–रेड्डी कोस्टल हायवे मधील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, कोकण किनारपट्टीवरील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.

सध्या कुंडलिका खाडीपात्रात पाइल फाउंडेशन तसेच पिलर उभारणीची कामे युद्धपातळीवर सुरू असून, अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बांधकाम करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या कामाला मिळालेली गती पाहता स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचेही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे लक्ष लागले आहे.

सुमारे ३.८२९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात जोडरस्त्यांसह चार मार्गिकांचा आधुनिक पूल उभारण्यात येणार आहे. ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहतूक सुरळीत पार पडेल, अशा मानकांनुसार पुलाची रचना करण्यात येत आहे. पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फूटपाथ तसेच युटिलिटी लाईन्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सुमारे ५२३ किलोमीटर लांबीच्या आणि अंदाजे २६ हजार कोटी रुपयांच्या रेवास–रेड्डी कोस्टल हायवे प्रकल्पात नऊ मोठ्या खाडी पुलांचा समावेश आहे. धरमतर, आगरदांडा, बाणकोट, दाभोळ, जयगड, केळशी आणि काळबादेवी यांसह रेवदंडा–साळाव खाडी पुलाला या संपूर्ण मार्गिकेत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या पुलाचे बांधकाम Ashoka Buildcon Ltd. या पायाभूत सुविधा कंपनीकडून करण्यात येत असून, सध्या प्रत्यक्ष कामाने चांगली गती घेतली आहे. रेवदंडा येथील विद्यमान जुना पूल अरुंद असून वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत तो अपुरा ठरत आहे. त्यामुळे नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

कोस्टल हायवे आणि रेवदंडा–साळाव खाडी पूल पूर्ण झाल्यानंतर कोकणातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय, उद्योग, वाहतूक आणि स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. अलिबागपासून सिंधुदुर्गपर्यंतचा किनारी प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होण्यास या प्रकल्पामुळे हातभार लागणार असून, रायगडच्या विकासाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

अलिबाग–मुरुडचा प्रवास होणार जलद

नवीन पुलामुळे अलिबाग तालुक्यातील रेवदंडा आणि मुरुड तालुक्यातील साळाव यांच्यात थेट व सक्षम संपर्क निर्माण होणार आहे. त्यामुळे अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन परिसरातील प्रवास अधिक जलद व सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. मुंबई आणि पुणे येथून मुरुड-जंजिरा, काशीद, रेवदंडा समुद्रकिनारा आदी पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या पर्यटकांच्या प्रवासाचा वेळही कमी होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT