

नवी मुंबई : मुंबईबाहेर महामुंबई प्रदेशातील एकमेव आंतरराष्ट्रीय स्टेडियम असलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर पुढील १८ ते २० महिने कोणतेही खेळ होणार नाहीत. मुख्य प्रेक्षक गॅलरी वगळता या स्टेडियमचे नूतनीकरण आणि विस्ताराचे काम हाती घेण्यात आले असून, मंगळवारपासून पाडकामही सुरू झाले.
सध्याच्या प्रेक्षक गॅलऱ्या पाडून त्यांची पुनर्बांधणी केली जाणार नाही. स्टेडियमची विद्यमान आसनव्यवस्था कायम राहणार आहे. प्रेक्षकांसाठीच्या सध्या उपलब्ध असणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच स्टेडियम अत्याधुनिक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे समजते. स्टेडियममधील हॉटेल्स, प्रसाधन गृहे आणि पॅव्हेलियनचा विस्तार केला जाणार आहे. खेळाडू, प्रसारमाध्यमे, प्रसारक आणि प्रेक्षकांसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा केली जाणार आहे.
या स्टेडियमवर विविध आंतरराष्ट्रीय सामने जसे होत आले त्याचप्रमाणे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील संगीत मैफिलीही होत आल्या आहेत. मात्र, पुनर्विकासाच्या कामामुळे असे कोणतेही कार्यक्रम दीड-दोन वर्षे होऊ शकणार नाहीत.
डी. वाय. पाटील स्टेडियमवर येत्या डिसेंबर महिन्यात भारत अ महिला आणि इंग्लंड अ महिला संघात तीन एकदिवसीय सामने रंगणार होेते. पहिला सामना ११ डिसेंबर रोजी होणार होता. दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे १४ आणि १९ डिसेंबर रोजी नियोजित होता. शिवाय हे दोन्ही संघ याच मैदानावर एक कसोटी सामनाही खेळणार होेते. हे सामने आता इतरत्र हलवावे लागतील.