रेवदंडा : रायगडसह कोकणात पर्यटनासाठी जाता यावे, यासाठी रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग विकसीत करण्यात येत आहे. या महामार्गाने रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे जोडले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मार्फत हे काम केले जात आहे. रेवस ते सिधुदुर्ग जिल्हातील रेड्डी हा रस्ता 498 कि.मी. आहे, या महामार्गात तीन पुल नव्याने बांधण्यात येत असून यामध्ये रेवदंडा ते साळाव हा कुंडलिका खाडी पुल सुध्दा नव्याने बांधण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत नव्याने बांधकाम विकसीत करण्यात येत आहे. या नवीन पुलाचे बांधकाम अशोका बिल्डकाँन लिमिटेड या कंपनीने स्विकारले असून साळाव ते रेवदंडा पुलाचे गेल्या काही महिन्यापुर्वीच स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून कामास सुरूवात करण्यात आली होती. सदर कामास जोरदार सुरूवात झाली असून कुंडलिका खाडीत नवीन पुलाचे काम होत असल्याचे दिसून येते.
सदर पुलाचे काम एम.एस.आर.डी.सी च्या माध्यमातून अशोका बिल्डकॉन लि. कंपनीने 36 महिन्यात पुर्ण करून द्यावयाचे आहे. या पुलास एकूण 1200 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केल्याचे सुत्रालयाकडून माहिती मिळते. अशोका बिल्डकॉन लि. कंपनीचे वतीने प्रोजेक्ट डायरेक्टर कौशल्य सिंग, प्रोजेक्ट इन्चार्ज, एस.टी. सोनावणे, प्रोजेक्ट मॅनेजर प्रदिप सिंग, तसेच ॲडमिनिस्ट्रेशन हेड मोहित तिवारी याचे मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.