

महाड : महाड एमआयडीसी हद्दीतून महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे. मागील काही दिवसापूर्वी नांगलवाडी फाटा येथून एक तरुणी बेपत्ता झाली होती, सदरची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आजीने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
15 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास पीडित मुलगी ही नांगलवाडी फाट्यावर दूध आणण्याकरिता घरातून निघून गेली होती. कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केल असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरच्यांनी मित्रपरिवार व आजूबाजूंच्या नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला मात्र कस्तुरी कुठेच न आढळून आल्यामुळे घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि कस्तुरी हिला कोणीतरी फूस लावून पळवून नेलं आहे अशी माहिती पोलिसांना दिली.
रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस काळे, चेहऱ्यावर पिंपल्स, अंगावर काळया रंगाची जीन्स, त्यावर पांढऱ्या रंगाचा टॉप, पायात गुलाबी रंगाची चप्पल असे वर्णन पोलिसांनी तक्रारी मध्ये नमूद केले असून अज्ञाताविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फडतरे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.