Rangumata Devi Temple pudhari photo
रायगड

Rangumata Devi Temple : तळोशी येथील नवसाला पावणारी देवी 'श्री रंगुमाता'

भक्तांना अभय देणारी देवता म्हणून मातेची आख्यायिका

पुढारी वृत्तसेवा

नाते : इलियास ढोकले

महाड हे कोकणातील अति महत्वाचे गांव. रायगडास जाण्यास येथूनच सुरुवात होते. महाड-रायगड रस्ता सुमारे अंतर पंचवीस किलोमीटर असून रस्ताही उत्तम स्थितीत आहे. रायगडच्या तळाशी असलेले एकमेव गांव म्हणजे तळोशी. महाड ते तळोशी यामधील मैदानी प्रदेशात शिवशाहीत शिवबंदीचा मुक्काम असायचा. गांधारीचे मुबलक पाणी आणि मैदानी सखल प्रदेश असल्यामुळे इथेच सैन्याचे तळ पडत.

अनेक लढायांचे सैन्य याच तळावरुन कामगिरीवर जात असे. असा हा सुरम्य परिसर याच तळोशी गावाची प्रसिद्धी येथील रंगुमाता देवस्थानामुळे साऱ्या महाराष्ट्रभर पसरली आहे. तळोशी हे छोटेसे गांव साऱ्या जगभर याच रंगुमाता देवस्थनामुळे पोचले आहे. नवसाला हमखास पावणारी जनसामान्यांची दुःखे दूर करणारी आणि गावाला आपल्या भक्तांना अभय देणारी देवता म्हणूनही या देवीचा लौकीक आहे.

महाडपासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर उत्तरेस महाड गावापासून दूरवर रंगुमाता देवस्थान आहे. नांददुकीची झाडी आणि कडेलाच स्वच्छ गोड्या पाण्याने भरलेली विहीर असे निसर्गाच्या सानिध्यात लाभलेली सुरम्य ठिकाण म्हणजे रंगुमाता देवस्थान ना देऊळ ना डौलारा. झाडाखाली असणारा एक पाषाण म्हणजेच साक्षात आई माता तळोशी देवी होय. गुजराथ भडोच इत्यादी भागापर्यंत या देवीचे भक्गण विखुरलेले आहेत.

गावातील पार्टे मंडळी या देवीचे पुजारी म्हणून वंश परंपरेने पूजा अर्चा करतात. फार पूर्वी पार्टे मंडळींची फक्त सहाच घरे होती. आता त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. हा मान क्रमाक्रमाने चैत्र प्रतिपदेपासून सतत बदलत असतो. मानकरी देवी पुढे नवस बोलणे, दिवाबत्ती लावणे, पुजाअर्चा करणे इत्यादी कामे अतिशय आवडीने व भावपूर्ण श्रद्धेने करत असतात.

फार पूर्वी देवीचा गवगवा कमी प्रमाणात होता. वर्षभर उन्हात, पावसात उघडयावर असणारी देवी देव-देवस्कीच्या कामासाठीच वापर होत होता. पण लोकांनी लक्ष देऊन या प्रथा बंद केल्या. लोकांच्या मनात देवीला निवारा करावा असे अनेकदा आले पण देवीचीच इच्छा नसल्यामुळे ते काम तसेच राहून गेले. तरीही भक्तांनी गांवकरी मंडळींनी देवीचा सारा परिसर सुशोभित केला. भक्तलोकांसाठी बसण्याची व्यवस्था, परिसराला उत्तम प्रतीची फरशी घालून वातावरण प्रसन्न ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

देवीजवळ आपले गा-हाणे सांगितले तर देवी रंगुमाता भक्ताला अभय देऊन त्याची मनोकामना पूर्ण करते अशी साक्षात्कारी देवी म्हणून देवीची प्रसिद्धी आहे. फार पूर्वी देवीजवळ चांदीच्या वस्तू त्या पेटीत ठेवत. पावसाळयात पत्रा कुसल्यामुळे साऱ्या वस्तू विखुरल्या जात पण कोणीही व्यक्ती त्या वस्तूंना हात लावण्यास धजत नसे.

आजही पाळणे घरे इत्यादी वस्तूंच्या प्रतिकृती तेथे देवीस भेट म्हणून देण्यात येतात. देवीच्या जवळील झाडांना दोऱ्या बांधून असंख्य वस्त्रे त्या दोऱ्यावर ठेवली जातात. उन्हा-पावसात हे उंची कपडे, शाली, लुगडे उघडयावर असतात पण कोणीही व्यक्ती या वस्तूंना बोटदेखील लावत नाही.

राखण करणारी देवता

देवीचे पुजारी देवीजवळ भक्ताचे गार्‍हाणे मांडतात. नारळ मानवून देवीपुढे फोडतात. देवीला प्रार्थना करतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. देवीचे भक्त सर्वस्तरात आहेत. त्यांची देवीवर अढळ श्रद्धा आहे. आपली राखण करणारी देवता म्हणून हे लोक रंगुमातेला भजत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT