कर्जत (रायगड) : मागील वर्षी माथेरानला पर्जन्यमानाचा दोन हजार मिलीमीटरचा टप्पा 19 जुलै रोजी पार झाला होता. पण यंदा मात्र सहा दिवस अगोदर म्हणजेच 13 जुलैलाच दोन हजार मिलीमीटरचा टप्पा पावसाने पार केला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त आहे. अजूनही पाउस चांगला पडत असून या वर्षी मागील वर्षापेक्षा पाऊस जास्त पडेल असा अंदाज माथेरान नगपालिकेचे पर्जन्यनोंद ठेवणारे अन्सार महापुळे यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी माथेरानला एकूण 5927 मिमी म्हणजेच जवळपास 234 इंच इतकी मान्सून पर्जन्यनोंद झाली होती. आणि गेल्या वर्षी पर्जन्यमानाचा एक हजार मिलिमिटरचा टप्पा 7 जुलै आणि दोन हजार मिलीमिटरचा टप्पा 19 जुलै रोजी पार झाला होता. यावर्षी, माथेरानला पर्जन्यमानाचा, एक हजार मिलिमिटरचा टप्पा 25 जून रोजी आणि दोन हजार मिलिमिटरचा टप्पा 13 जुलै रोजी पार होऊन माथेरानला 13 जुलै पर्यंतचे मान्सून पर्जन्यमान हे 2013.8 मिमी इतके झाले आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सहा दिवस अगोदरच दोन हजारी मिमीचा टप्पा माथेरानच्या पर्जन्यवृष्टीने पार केला आहे.
यावर्षी, मान्सूनपूर्व पाऊसाला सुरुवात मे महिन्यातच झाली होती. आणि संपूर्ण मे महिन्यात एकूण 575 मिमी इतकी पर्जन्यनोंद 31 मे 2025 पर्यन्त झाली होती. यावर्षी, एकाच दिवसांत म्हणजेच फक्त 24 तासांत 19 जूनला 262 मिमी इतकी प्रचंड आणि सर्वोच्च पर्जन्यनोंद माथेरानला आतापर्यंत झाली आहे.
यावर्षी सुरू झालेल्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी जुने वृक्ष पङून गाङयाचे तसेच ई रिक्षाचे नुकसान झाले तर जमीन खचून घराला धोका निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली पण जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही तर लुईझा पॉईटला संरक्षण रेलींग तुटली होती पण वनसमितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी लक्ष घालून तात्काळ ती समस्या दूर केली.
माथेरानला पर्जन्यमानाचा, एक हजार मिलिमिटरचा टप्पा 25 जून रोजी आणि दोन हजार मिलिमिटरचा टप्पा 13 जुलै रोजी पार होऊन 13 जुलैपर्यंतचे पर्जन्यमान हे 2013.8 मिमी इतके झाले आहे.