Rain hits agriculture in Kharepat
वढाव : प्रकाश माळी
मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच वरुणराजाने अवकाळी सुरुवात करुन पेण तालुक्यासह पेण खारेपाट भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील बळीराजा हताश होवुन मोठ्या आशेने येणार्या खरीप पिकांची वाट पाहणारा शेतकरी निराश झाला आहे.
संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजा अर्थात शेतकर्याला ओळखले जाते. शेतकरी काबाडकष्ट करून शेतात धान्य पिकवतात म्हणून आपण आपल्या घरात सुखाने चार घास खाऊ शकतो. भारतात बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागातील असून भारताचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सहाजिकच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी बांधवांचा सर्वात मोठा वाटा आहे. आत्ता हाच शेतकरी मोठया संकटात सापडला आहे. खर पाहता जून महिन्यात 7 जूनला पावसाळा सुरू होतो. त्याप्रमाणे बळीराजा जून महिन्याअगोदर मे महिन्यात भात पेरणी करण्यास सुरुवात करतो. पंरतु मे महिन्याच्या अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने येथील बळीराजाने शेताची मशागत करून ठेवलेली वाया गेली.
पेरणी आधी शेतीची मशागत केल्याने शेतीच्या मातीत उब निर्माण होते. यामुळे पेरणी केल्यावर पिक चांगले प्रकारे येते परंतु अवकाळी पावसाने येथील शेतातील उब निघुन गेली आणि आत्ता जून महिन्यात पेरणी कशी करायची हा प्रश्न बळीराजाला पडला आहे.
अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतीच्या नियोजनावर पाणी फेरले आहे. मे महिना शेती मशागतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असताना, तसेच मेमध्ये शेतीची नांगरणी होऊन जमीन तापली तरच जून महिन्यात लागवड झालेल्या पिकांची उगवणक्षमता चांगली असते. मात्र, या मे महिन्यातील अवकाळी पावसाच्या मुक्कामाने खरीपपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे खारेपाटातील शेतकर्यांचे काम ठप्प झाले आहे.
नांगरणी, खत टाकणे, बांधबंदिस्त यांसारखी पूर्वतयारी होण्याआधीच वातावरणाने पलटी घेतल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीवर संकटाचे सावट घोंगावत आहे. दर वर्षी प्रमाणे जे उत्पन्न शेतीला मिळते त्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होवुन 100 टक्के पैकी 30 टक्केउत्पन्न मिळेल. यामुळे येथील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी सापडणार आहे. तसेच पेरणी पावसामुळे न झाल्याने पुढील पेरणीसाठी मजूर तसेच आर्थिक बाब मोठ्या प्रमाणात लागणार आहे.
एकनाथ ठाकूर, शेतकरी
या पावसात तालुक्यातील उन्हाळी भात शेताची दैना झाली आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी येणारे भात पीक पावसामुळे आडवे झाले असून भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांकडून तालुक्यात उन्हाळी भात पिकाची लागवड करण्यात आली होती परंतु पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे लागवडीतील भात पिकाचे नुकसान झाले असल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला असून शेती पाण्याखाली जाऊन आडवी झाल्याने शेतकर्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवकाळी पावसामुळे पेण तालुक्यातील अंदाजे 10 गावांतील सुमारे 100 ते 120 हेक्टर मधील भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून पेण तालुका कृषी विभागाकडून नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे कृषी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहे तर नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई करण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.