Central Railway Minister Meeting
महाड : मागील काही वर्षापासून महाडच्या महापुरा संदर्भात कळीचा मुद्दा ठरलेल्या दासगाव रेल्वे पूल संदर्भात चालू आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रेल्वेच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली असून, यामध्ये दासगाव रेल्वे पुलासह महाड एमआयडीसी मधील रेल्वे मार्ग संदर्भात चर्चा होऊन प्रश्न निकाली निघण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आज महाडमध्ये त्यांच्या निवासस्थानी येऊन श्रद्धांजली अर्पित केल्यावर स्थानिक पत्रकारांबरोबर खासदार सुनील तटकरे संवाद साधित होते.
स्वर्गीय माणिकराव यांनी आपल्याबरोबर दीर्घकाळ काम केले होते. असे नमूद करून जिल्ह्यातील एक लढाऊ नेते म्हणून त्यांची ओळख होती. आजच्या या हृदयस्पर्शी स्मृतिदिनी मी त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी नमूद केले.
रायगड सह कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संपूर्ण क्षमतेने काँक्रिटीकरण व सर्विस रोडची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत टोल वसूल करून दिला जाणार नसल्याचे आपण लोकसभेचा सदस्य म्हणून आपली आग्रही व ठाम भूमिका मांडत असल्याचे सांगितले.
हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन विशिष्ट काळापर्यंत या संदर्भातील विविध विभागातील आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात येणार असून त्या पश्चात समन्वय समितीमध्ये याबाबतचा निर्णय होईल व पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट केले.