

पनवेल : पनवेल शहरात नात्यांना काळिमा फासणारी आणि समाजमन हादरवणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या आत्याच्या पतीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अत्याचारातून ती पाच महिन्यांची गरोदर राहिल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पनवेलमधील आत्याकडे राहत होती. मात्र तिच्या निराधारतेचा फायदा घेत आत्याच्या पतीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. पीडिता लहान असल्यामुळे ती घाबरून गेली आणि कुणालाही ही बाब सांगू शकली नाही.
अलिकडेच पीडित मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्याने तिने मावशीला पोटात काहीतरी फिरतंय असे सांगितले. तिच्या बोलण्यावरून संशय आल्याने मावशीने तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर धक्का बसलेल्या मावशीने मुलीसह थेट पनवेल शहर पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.