अलिबाग : रमेश कांबळे
ग्रामीण भागातील विकासाचा पाया निर्माण करणा-या रायगड जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. अनेक विभागातील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्याचप्रमाणे काही विभागात अधिका-यांना प्रभारी म्हणून जास्तीचे काम पहावे लागत आहे. रायगड जिल्हा परिषदेत एकूण 11 हजार 555 पदे मंजूर असून 2 हजार 609 पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक चालवत आहेत. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत प्रशासकांच्या खांद्यावर जिल्हा परिषदेच्या कारभाराची जबाबदारी आहे. त्यातच जिल्हा परिषदेत गट ब, क व ड संवर्गातील एकूण 2 हजार 609 पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग ब मधील सामान्य प्रशासन विभागातील लघुलेखक 3; वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी 7; बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता 34; ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता 54; शिक्षण विभाग विस्तार अधिकारी 46, केंद्रप्रमुख 132, मुख्याध्यापक प्राथ.95 असे एकूण 371 तसेच गट क मध्ये सामान्य प्रशासन विभागातील 164 पदे, वित्त विभाग 19, ग्रामपंचायत विभाग 86, आरोग्य विभाग 640, बांधकाम विभाग 87, ग्रामीण पाणीपुरवठा 1, पशु संवर्धन विभाग 25, शिक्षण विभाग प्राथमिक 981, महिला व बालकल्याण विभाग 36 अशी एकूण 2050 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे गट क मधील सामान्य प्रशासन विभागातील 138, पशु संवर्धन विभाग 4, आरोग्य विभाग 20, बांधकाम विभाग 30 अशी एकूण 192 पदे आहेत. अशी रायगड जिल्हा परिषदेत एकूण 11 हजार 555 पदे मंजूर असून गट ब, क व ड संवर्गातील एकूण 2 हजार 609 पदे रिक्त आहेत.
काही विभागातील अधिका-यांकडे एकापेक्षा जास्त विभागांचे काम करावे लागत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. रायगड जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक चालवत आहेत. सद्य स्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळत आहेत. रायगड जिल्हा परिषदेत सध्या विविध विभागांमध्ये रिक्त पदे आहेत, जी भरण्यासाठी भरती प्रक्रिया चालू आहे. विविध पदांकरिता कंत्राटी किंवा सरळसेवा भरतीसाठीच्या जाहिराती जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
जिल्हा परिषदेतील जी काही रिक्त पदे आहेत, ती सर्व शासन स्तरावर भरण्यात येतात. जिल्हा परिषदेकडून रिक्त पदांचा अहवाल शासनाकडे नियमित पाठविण्यात येत असून रिक्त पदे भरण्यासाठी मागणीही करण्यात आली आहे. लवकरच ही पदे भरण्यात येतील अशी अपेक्षा आहे.नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप