रायगड : रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. जीर्ण झालेली ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे रायगडच्या जिल्हा रुग्णालयापाठोपाठ जिल्हा परिषदेची इमारत देखील मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत.
राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने यास मंजूरी दिली असून, नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 77 कोटी 83 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवतीर्थ इमारत पाडून त्या जागेवर सात मजली सुसज्ज इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत धोकादायक असल्याचा अहवाल चार वर्षांपूर्वी प्राप्त झाला होता. यावेळी इमारतीमधील विविध विभागांची कार्यालये इतरत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना करण्यात आली होती. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील स्थापत्य अभियंत्यामार्फत इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. यात ही इमारत धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला होता.
त्यामुळे इमारत पाडून नव्याने बांधण्यात यावी, अशी सूचनाही करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील विविध विभागांची कार्यालये शहरातील कुंटे बाग, पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग पंचायत समिती इमारत येथे हलविण्यात आली. यानंतर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीला मान्यता दिली आहे.
शिवतीर्थ या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम 1978 ते 1982 या कालावधीत करण्यात आले होते. इमारतीच्या बांधकामाला 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. लोकल बोर्ड बरखास्त होऊन जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर पेण येथील जिल्हास्तरीय कार्यालये अलिबाग येथे एका छताखाली आणण्याचा प्रयत्न तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी केला होता. त्यानंतर विभागांची संख्या वाढल्याने तळ मजल्यासह दोन मजल्याची इमारत कमी पडू लागली. त्यानंतर इमारतीच्या टेरेसवर वाढीव बांधकाम करून नवी कार्यालये सुरू करण्यात आली होती.
77 कोटी 83 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील टी अँण्ड टी विक्रम इन्फ्रा जेव्ही कंपनीला या कामाचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. आता मात्र जुनी इमारत पाडण्याला मंजुरी मिळाली आहे, इमारतीवरील चौथा मजला काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नवीन इमारतीत तळ मजल्यावर पूर्णपणे पार्किंगची व्यवस्था असून त्यावर सात मजले असतील. जिल्हा परिषदेचे बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. साधारण 550 कर्मचाऱ्यांच्या कामासाठी प्रशस्त जागा निर्माण केली जात असून अभियंत्यांसाठी स्वतंत्र कक्षाचे नियोजन आहे. इमारतीमध्ये पदाधिकारी, अधिकारी यांच्या दालनांची अंतर्गत सजावट आधुनिक शैलीत असली तरी जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तर दुसरी इमारत ही पंचायत समिती कार्यालयाशेजारी उभारण्यात येणार आहे.