

Mahad MIDC missing case
महाड : महाड एमआयडीसी परिसरात महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी काही बेपत्ता महिलांचा शोध लागला असला तरी काही प्रकरणे अद्यापही अनुत्तरित आहेत. अशातच महाड तालुक्यातील नडगाव येथून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नवी घटना समोर आली आहे.
नडगाव संतोष नगर येथे वास्तव्यास असलेली सुंदरी अनुप हिरा (वय 19, मूळ राहणार – कलकत्ता, पश्चिम बंगाल) ही तरुणी 15 जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली होती. मात्र ती संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी चौकशी करूनही सुंदरीचा काहीही ठावठिकाणा न लागल्याने अखेर तिची आई पूजा अनुप हिरा यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुंदरीचा रंग सावळा, उंची सुमारे पाच फूट, अंगकाठी सडपातळ असून केस व डोळे काळ्या रंगाचे आहेत. बेपत्ता होताना तिच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची प्लाझो होती. तिच्याकडे रेडमी कंपनीचा मोबाईल फोनही होता.
या प्रकरणाचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार एस. एन. उमरटकर करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सुंदरीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.