Raigad Teacher Recruitment AI Image
रायगड

Raigad Teacher Recruitment: तरुण शिक्षकांच्या प्रवेशाने ग्रामीण शिक्षणाला नवी ऊर्जा; रायगडमध्ये पवित्र पोर्टलमधून ३५१ उपशिक्षकांची निवड

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शाळांसाठी पवित्र पोर्टलद्वारे ३५१ उपशिक्षकांची निवड झाली आहे. यात मराठी माध्यमाचे ३४० आणि उर्दू माध्यमाचे ११ शिक्षक असून कागदपत्र पडताळणीनंतर नियुक्ती देण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा दिवेकर

अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शाळांना आता तरुण शिक्षकांची नवी ताकद मिळणार आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी ३५१ उपशिक्षकांची निवड झाली असून, यामध्ये मराठी माध्यमाचे ३४०, तर उर्दू माध्यमाचे ११ शिक्षक आहेत.

पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना नियुक्तीपत्र देऊन शाळांमध्ये रुजू करण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांना मोठा आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध शिक्षकांवर अध्यापनासोबतच प्रशासकीय आणि इतर शैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार येत आहे.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये ही समस्या अधिक जाणवत असून, दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भरून काढण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. पोलादपूर, महाड, श्रीवर्धन आदी तालुक्यांतील दुर्गम शाळांकडे विशेष लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मराठी माध्यमाची ६३८८ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ५२४९ पदांवर शिक्षक कार्यरत असून ११३९ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमाची ३५५ मंजूर पदे असून २७७ पदे कार्यरत आहेत.

त्यामुळे उर्दू माध्यमाची ७८ पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमाच्या ४८५ आणि उर्दू माध्यमाच्या ३५, अशा एकूण ५२० पदांची मागणी केली होती. त्यापैकी ३५१ पदांना मंजुरी मिळाली आहे.

दरम्यान, २ सप्टेंबरपासून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यात आली आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरून अर्ज केले होते.

उर्वरित रिक्त पदांसाठी ऑक्टोबरमध्ये पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

६१७ पदांची तूट कायम

३५१ शिक्षक रुजू झाल्यानंतरही रायगडमधील शिक्षकांची कमतरता पूर्णपणे दूर होणार नाही. मराठी माध्यमातील सुमारे ५५० आणि उर्दू माध्यमातील ६७, अशी एकूण ६१७ पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे नव्या शिक्षकांमुळे कार्यरत शिक्षकांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार असली, तरी उर्वरित रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT