Raigad Zilla Parishad Pudhari
रायगड

Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपूर्वीच गोंधळ; अध्यक्ष-उपाध्यक्षांसाठी कार्यालयच नाही

12 मार्चला निवड प्रक्रिया; कार्यालय व निवास व्यवस्थेअभावी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन होण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली असली तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींना बसण्यासाठी कार्यालयच नाहीत त्याची निवासस्थाने नाहीत. त्यामुळे कारभार चालवायचा कसा आणि कोठून हा प्रश्नच आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 12 मार्च रोजी अलिबाग येथील नियोजन भवनाच्या सभागृहात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेवर अधिकृतपणे सत्ता स्थापन होऊन गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपणार आहे.

मात्र सत्ता स्थापन होण्याआधीच अध्यक्ष-उपाध्यक्ष बसणार कुठे, राहणार कुठे आणि सभा घ्यायच्या कुठे, असे मूलभूत प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत कमकुवत आणि नादुरुस्त झाल्यामुळे त्या इमारतीतील प्रशासकीय कारभार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सध्या जिल्हा परिषदेचे कामकाज कुंटेबाग येथील कार्यालयातून सुरू आहे. मात्र येथे जागेची मोठी कमतरता असल्यामुळे अनेक विभागांना अजूनही या ठिकाणी सामावून घेता आलेले नाही.

विशेष म्हणजे याच परिसरातील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे निवासस्थानही प्रशासनाने कार्यालय म्हणून वापरायला घेतले आहे. त्यामुळे आता सत्तेवर विराजमान होणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी निवासस्थानाची कोणतीही व्यवस्था उरलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयीन व्यवस्था करण्यासाठी अध्यक्षांच्या बंगल्यामध्ये अध्यक्षांचे कार्यालय तसेच दोन विषय समित्यांच्या सभापतींची कार्यालये थाटण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उपाध्यक्षांच्या बंगल्यामध्ये उपाध्यक्षांचे कार्यालय आणि दोन अन्य सभापतींची कार्यालये उभारली जाणार आहेत. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या ठिकाणी बसतात. त्या ठिकाणी आणखी एका सभापतीचे कार्यालय करण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात कार्यालयीन व्यवस्था उभी राहणार असली तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी राहण्याची व्यवस्था मात्र अद्यापही हवेतच आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठका कोणत्या ठिकाणी घ्यायच्या, हा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 12 मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची बैठक जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात होणार आहे. मात्र या सभागृहात कार्यक्रम घेण्यासाठी सुमारे 25 हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी येथे बैठक घेणे जिल्हा परिषदेच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

दरम्यान, कुंटेबाग परिसरामध्ये सध्या दुमजली इमारतीचे बांधकाम सुरू असून या इमारतीचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

20 मार्चपूर्वी पहिली बैठक घेण्याचे निर्देश

रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी पार पडली होती. 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. मात्र अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया प्रलंबित होती. ग्रामविकास विभागाने 20 मार्चपूर्वी पहिली बैठक घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. 12 मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष बैठक होणार आहे.

प्रशासनाने स्वतःचे कक्ष केले अद्ययावत

गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती होता. या काळात प्रशासनाने स्वतःच्या विभागांची कार्यालये व्यवस्थित उभी केली; मात्र निवडून येणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी कार्यालय किंवा निवासस्थानाची व्यवस्था करण्याचा विचारही करण्यात आला नाही, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.

कुंटेबाग येथील परिसरात सत्ताधाऱ्यांसाठी कार्यालय आणि निवासस्थानाची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या सुरू असलेले इमारतीचे बांधकाम मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभा आणि सर्वसाधारण सभा या नियोजन भवनातील सभागृहातच घेण्यात येतील.
नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT