

रायगड : जयंत धुळप
सद्यस्थितीत इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशातील निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. कोकणातील आंबा निर्यातीला दरवर्षी 15 ते 20 मार्चला सुरुवात होते. परिणामी, 15 मार्च पूर्वी आखाती देशांतील हे युद्ध थांबले नाही तर कोकणातील हापूससह अन्य आंब्यांच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याची भीती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली आहे.
कोकणातून प्रामुख्याने हापूस (अल्पान्सो) आंब्याची मोठी निर्यात केली जाते. भारतातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीत एकट्या महाराष्ट्राचा वाटा साधारण 60 ते 70 टक्के असतो. यामध्ये कोकणातील हापूस आंब्याचा सहभाग मोठा असतो. कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतून दरवर्षी सुमारे 1 लाख 70 हजार मेट्रिक टन हापूस आंब्याचे उत्पादन होते. या उत्पादनापैकी साधारण 20 हजार ते 25 हजार मेट्रिक टन आंबा दरवर्षी थेट परदेशात निर्यात होतो. कोकणातील हापूस आंब्याला संयुक्त अरब अमिरात (यूएई) ही सर्वात मोठी बाजारपेठी बाजारपेठ आहे. तर त्या शिवाय अमेरिका (यूएसए), इंग्लंड (युके), जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय देशांत ही निर्यात होत असल्याचे चंद्रकांत मोकल यांनी सांगितले. कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एपीईडीए) या भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत स्थापित वैधानिक संस्थेच्या अहवालानुसार सन 2024-25 च्या हंगामातील आकडेवारीनुसार 35 हजार मेट्रिक टन फ्रेश मँगोची (ताजा आंबा) निर्यात करण्यात आली, त्याचे निर्यात मूल्य 600 कोटी रुपये होते.
ताज्या आंबा फळांशिवाय, कोकणातून मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेला मँगो पल्प अर्थात आमरस निर्यात होतो. कोकणातील एकूण हापूस उत्पादनापैकी 25 ते 30 टक्के आंबा प्रक्रिया उद्योगाकडे जातो, ज्यातील 85 टक्के मँगो पल्प युरोपीय देशांत निर्यात होतो. आखाती देशांत देखील आंब्याला मोठी बाजारपेठ आहे. अशा सर्व परिस्थितीत युद्ध परिस्थिती लांबली तर कोकणातील आंब्यांच्या निर्यातीमध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने समन्वयातून आताच नियोजन गरजेचे असल्याचे चंद्रकांत मोकल यांनी पुढे सांगितले.
आंब्याचे निर्यात मूल्य हे दरवर्षीच्या बाजारभावावर आणि आंतरराष्ट्रीय मागणीवर अवलंबून असते. आंबा निर्यातीतून महाराष्ट्राला त्यात प्रामुख्याने कोकणाला दरवर्षी 600 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. हापूस आंबा हा जगातील सर्वात महागड्या जातींपैकी एक असल्याने, त्याचे निर्यात मूल्य इतर वाणांपेक्षा जास्त असते. त्यातच हापूस आंब्याला जीआर टॅग मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कोकणच्या आंब्याला अधिक विश्वासार्हता आणि जास्त भाव मिळू शकत आहे.
रत्नागिरी : इराण-इस्रायल व अमेरिका संघर्षामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीवर होण्याची शक्यता आहे. त्यातच बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या बागांमध्ये नर मोहोरांचे प्रमाण वाढून मोहोर करपल्याने यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात सुमारे 80 टक्क्यांची घट होणार असल्याचा निष्कर्ष कृषी विभाग व कोकण कृषी विद्यापीठाच्या संयुक्त पाहणीतून समोर आला आहे.