अलिबाग : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात छाननी अंती एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेण्यात अबघे 3 दिवस आहेत. यावेळी निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवारांची गर्दी दिसून आहे. यामुळे निवडणुकीत अपक्षांनी मोठी रंगत आणली असून अपक्ष उमेदवार प्रमुख उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडवू शकतात. येत्या दोन दिवसात कोण माघार घेणार? याची उत्सुकता आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.छाननी झाली. 27 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तत्पूर्वी आघाडी, युतीचे गणित काही सुटले नाही. प्रत्येक पक्षाला आणि त्या पक्षाच्या उमेदवारांनी आपला हेका कायम ठेवला. कुठे उमेदवार मिळत नव्हते. आणि जिथे मिळाले तिथे सर्वांनीच आपला हक्क सांगितला. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत कोडे सुटले नाही. त्यामुळे युती आणि आघाडीच्या राजकारणात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले.
2017 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी अशी आघाडी होती. तर शिवसेना- भाजप युती होती आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढली होती. त्यावेळी शेकापच्या 23, राष्ट्रवादी 12, शिवसेना 15, काँग्रेस 3 आणि भाजप 3 असे पक्षीय बलाबल होते. मात्र यावेळी अद्यापर्यंत कोणत्याही पक्षाने युती किंवा आघाडीची घोषणा केली नसल्याचे चित्र आहे.
छाननी नंतर आता खऱ्या अर्थाने अंतिम चित्र काय असेल? हा प्रश्न पडला आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याच धाडस कोणी करणार नाही. असे सध्याचे चित्र आहे . त्यातून मित्र पक्ष हट्टाला पेटले तर स्वबळ आजवण्याशिवाय पर्याय नाही.शिवसेना, भाजपा, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात युती असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र सूर जुळले नाहीत. एकीकडे एकत्र लढलो तर फायदा होईल,असा सूर निघत आहे,तर दुसरीकडे एकमेकांवर उडवलेले शिंतोडे लक्षात घेऊन काही झाले तरीही युती नाही. असा सूरही कानावर पडत आहे.