Raigad Zilla Parishad Election Pudhari
रायगड

Raigad Zilla Parishad Election: रायगडमध्ये कडवी लढत; जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची? भाजप ‘किंगमेकर’ भूमिकेत

शिवसेना 20, राष्ट्रवादी आघाडी 22, भाजप 14 जागांवर; पालकमंत्री पदासह सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्यामध्ये आमने-सामने ठाकलेल्या शिवसेना राष्ट्रवादी या दोन पक्षामध्ये कडवी झुंज झाल्याचे पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी भाजप तर काही उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबत युती करून निवडणूक लढवली. या युतीचे 22 उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेला 20 जागांवर विजय मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 59 जागा असून भाजपला 14 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे भाजप आता राष्ट्रवादी बरोबर जाणार की शिवसेनेबरोबर जाणार यावर सत्तेची समीकरणे ठरणार आहेत.

शिवसेनेला महाडमध्ये 6, पोलादपूरमध्ये 2, माणगाव 2, अलिबाग 6, खालापूर 1, रोहा 2, पेण 1 अशा 20 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी भाजपमध्ये रोहा 3, श्रीवर्धन 2, म्हसळा 2, कर्जत राष्ट्रवादी - उद्धव ठाकरे शिवसेना 6, खालापूर 2, उरण 2, अलिबाग 1, तळा 2, माणगाव 2 अशा 21 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला पनवेल 8, पेण 4, रोहा 1, खालापूर 1 अशा 14 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 30 जागांची गरज असून भाजप शिवसेनेच्या सदस्यांची संख्या 34 होते. तर राष्ट्रवादी भाजप यांची संख्या 35 होत आहे. त्यामुळे भाजपला दोघांपैकी एक मित्र सत्तेसाठी बरोबर घेणे शक्य आहे. त्यामुळे यापैकी कुठली गणिते जमणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले अशी जोरदार लढत पाहायला मिळाली. यामध्ये प्रतिष्ठेची माणगाव, निजामपूरची जागा शिवेसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या राजीव साबळेंमुळे प्रतिष्ठेची झाली होती. ही जागा शिवसेनेने जिंकली आहे. तर अलिबागमध्ये शेकापमधून भाजपमध्ये गेलेल्या आंबेपूर मतदारसंघातील चित्रा पाटील यांच्या मतदार संघात शिवसेनेने मुसंडी मारली आहे. कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही मोठा फटका बसला आहे. सहाही जागा राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांच्या युतीने जिंकल्याने शिंदेंच्या शिवसेनेची येथे पिछेहाट झाली आहे. नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी उद्धव ठाकरे युतीनेच विजय मिळवला होता. त्यानंतरचा हा दुसरा धक्का आहे. त्यामुळे या भागामध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत होताना दिसत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही शिवसेना-राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच आहे. 15 ऑगस्टची झेंडावंदन राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी केले. तर 26 जानेवारीचे झेंडावंदन शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी केले. आजपर्यंत पालकमंत्री कुणाचा हे ठरलेले नाही. मात्र आता जिल्हा परिषदेला भाजप कुणाबरोबर जाणार यावर पालकमंत्री पदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

एकूण या निवडणुकीत सिंधुदुर्गात मंत्री असलेले नितेश राणे, आणि आमदार असलेले निलेश राणे, रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत, तर रायगडमध्ये सुनील तटकरे, भरत गोगावले अशा प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आपापले गड मंत्र्यांनी अबाधित राखल्याचे दिसत आहेत. याला अपवाद ठरले ते आमदार महेंद्र थोरवे. पंचायत समितीमध्ये शिवसेनेने महाड, माणगाव, पोलादपूर, अलिबाग, मुरूड अशा पाच पंचायत समित्या जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि कर्जत अशा प्रत्येकी पाच पंचायत समिती या पक्षाने जिंकल्या आहेत. मात्र कर्जतमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे साथ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मिळाली होती. भाजपने पनवेल, पेण, खालापूरमध्ये आपले वर्चस्व दाखवले आहे. तर उरणमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. यामध्ये शेकाप आठ पैकी 4,ठाकरे शिवसेना 3 असे महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असून भाजपला 1 जागा मिळाली आहे.

अलिबागमध्ये 14 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेने 12 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. शेकापला 1, तर भाजपला 1 जागा मिळाली आहे.पनवेलमध्ये एकूण 16 जागांपैकी भाजपला 15 जागा तर उद्धव ठाकरे शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. खालापूरमध्ये एकूण 8 जागांपैकी भाजप 4, राष्ट्रवादी काँग्रेस 1, शिवसेना 2, उद्धव ठाकरे शिवसेना 1 असे विजय मिळाले आहेत.कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस - 6 जागा, उद्धव ठाकरे शिवसेना - 4 जागा, भाजप - 2 जागा असे विजय मिळाले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला येथे खातेही खोलता आलेले नाही. महाड तालुक्यात पंचायत समितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवला आहे.

दहा जागांपैक दहाही जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. तर पोलादपूरमध्ये चारपैकी चार जागा जिंकून विजय मिळवला आहे. तळामधील चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. म्हसळामधील चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीवर्धनमध्ये चार पैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस, एक शिंदेंची शिवसेनेने जिंकल्या आहेत. मुरूड पंचायत समितीत चारही जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. तर सुधागडमध्ये चारपैकी दोन भाजप, एक राष्ट्रवादी, एक ठाकरे शिवसेना, पेणमध्ये 10 पैकी 8 भाजप दोन उद्धव ठाक रे शिवसेनेने जिंकल्या आहेत.

प्रस्थापितांचा पराभव

या निवडणुकीत काही दिग्गजांनाही पराभवास सामोरे जावे लागले.यामध्ये भाजप खा. धैर्यशील पाटील यांच्या पत्नी माजी जि.प.अध्यक्षा ॲड.निलीमा पाटील (जांभूळपाडा), चित्रा पाटील (आंबेपूर),माजीआ.पंडित पाटील यांच्या पत्नी सुश्रुता पाटी(घोसाळे), मुलगा सवाई पाटील ( शहापूर) ,माजी जि.प.सभापती ॲड. राजीव साबळे(माणगाव) आदींचा मोठा पराभव सहन करावा लागला आहे. माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे पूत्र अमित मोरे यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. पेणचे आ.रवींद्र पाटील यांच्या सून शर्मिला वैकुंठ पाटील यांना शिहू गटातून पराभूत झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT