NCP  Pudhari
रायगड

Raigad Zilla Parishad: पाठिंब्याचा हुकमी एक्का वापरून भाजपने रायगडात मिळवले अध्यक्षपद

भाजप-राष्ट्रवादी सत्तासमीकरण जुळले; शिवसेनेला अध्यक्षपद हुकले, कोकणातील राजकारणात नवा टप्पा

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत सावंत, ठाणे

रायगड जिल्हा परिषदेत पाठिंब्याचा हुकमी एक्का वापरून भाजपने अध्यक्षपद मिळवले. जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. या साऱ्या घडामोडीमध्ये भाजपच्या पाठिंब्याशिवाय रायगड झेडपीचे राजकारण पुढे सरकणारच नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनीही पाठिंब्याची साद भाजपला घातली आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला काहीसे झुकते माप देत आपला अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष असे सत्ता समीकरण जुळवून आणले. यामुळे रायगडमध्ये राजकारणाचा नवा अध्याय तयार झाला.

रायगड जिल्हा परिषदेत एकूण 59 सदस्य आहेत. यामध्ये सर्वाधिक 21 सदस्य शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस 16 आणि भाजप 15 सदस्य अशा या राजकीय गणितामध्ये कुठल्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी भाजपला बरोबर घेणे आवश्यक होते. कारण, महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पाच सदस्य, तर काँग्रेसकडे दोन सदस्यांचे संख्याबळ असल्याने विरोधक शक्तिहीन झाले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या तीन पक्षांकडे एकूण 51 सदस्य आहेत. त्यामुळे महायुतीकडे मोठे बहुमत असले तरी सत्तेत येण्याचा पहिला पर्याय जो मान्य झाला होता, तो भाजप-राष्ट्रवादी पक्षाचा आणि यामध्ये सत्ता समीकरणे निश्चित झाल्यानंतर शिवसेनेनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरला. शेवटी शिवसेनेला सभापतिपदाच्या निवडणुकीत सहभागी करून घेण्याचे सूत्र ठरले. मात्र, तरीही अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी पाठ फिरवली होती. हे चित्र पाहिल्यानंतर शिवसेना आजही सत्ता समीकरणांपासून दूर आहे का, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली. खरं तर सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवेसनेला अध्यक्षपद हवे होते; मात्र पाठिंब्याचा हुकमी एक्का भाजपच्या हातात असल्याने शिवसेनेचे मनसुबे पुढे जाऊ शकले नाहीत.

कोकणात भाजपने सिंधुदुर्ग आणि रायगड अशा दोन जिल्हा परिषदांवर अध्यक्षपद मिळवण्याचा योग जुळवून आणला आहे. कारण, सिंधुदुर्गात अध्यक्षपदाची निवड व्हायची असली तरी तेथे भाजपचेच बहुमत आहे. त्यांचा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजपने आपले प्राबल्य वाढवल्याचा हा संदेश या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आला आहे. कोकणात एकूण चार जिल्हा परिषदा येतात. यापूर्वी या सर्व जिल्हा परिषदांवर शिवसेनेने आपले प्राबल्य मिळवले होते. रायगड जिल्ह्यात शिवसेना-शेकाप असे समीकरण यापूर्वी पाहायला मिळाले होते. मात्र, नंतर ते बदलून राष्ट्रवादी-शेकाप असे सत्ता समीकरण तयार झाले. मात्र, आता शेकापचा रायगडचा बालेकिल्ला पूर्णपणे ढासळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले प्राबल्य प्रस्थापित केले आहे, तेही भाजपच्या साथीने. यामुळे शिवसेनेची तगमग वाढली आहे. याचे पडसाद अनेकदा उमटतात.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सत्तासमीकरणात कर्जत आणि खोपोली या विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती अनुक्रमे नगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाहायला मिळाली. आज कर्जतमध्ये नगरपालिका आणि पंचायत समितीवर ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र आहेत. तर जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी एकत्र आहेत. शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही, याचा फैसला 23 मार्चला होणार आहे. कारण, त्या दिवशी जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक होत आहे. एकूण रायगडच्या राजकारणावर सध्या तरी भाजप-राष्ट्रवादी युतीचे प्राबल्य पाहायला मिळत आहे. कारण, पंचायत समित्यांवर भाजप शिवसेनेकडे 9 सभापती पदे आली आहेत. शिवसेनेकडे पाच, तर महाविकास आघाडीकडे एक सभापतिपद आले आहे. त्यामुळे दोन्हीकडे सध्या तरी भाजप-राष्ट्रवादीची सरशी झाली आहे. मात्र, या सरशीनंतर शिवसेनेने काळा दिवस जाहीर केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे रायगडचा राजकीय तिढा आजही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पुन्हा तापला पालकमंत्रिपदाचा मुद्दा

रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी पालकमंत्रिपदाची रस्सीखेच राज्यातील सत्तास्थापनेपासून सुरू आहे. रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना प्रथम जाहीर झाले होते. मात्र, शिवसेनेच्या विरोधानंतर ते स्थगित झाले. सत्तास्थापनेला आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी पालकमंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे दोन पक्षांत अस्वस्थता आहे. यात रायगडच्या पालकमंत्रिपदावरून ठाकरे सरकारच्या काळात नाराजी नाट्य रंगले होते. त्यावेळी सरकार पाडण्याच्या अनेक मुद्द्यांमध्ये हाही एक मुद्दा होता. आता जिल्हा परिषदेच्या राजकीय सत्ता स्पर्धेमध्ये हा मुद्दा पुन्हा तापला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT