Raigad Youth drown death
बोर्ली पंचत : अभय पाटील
तालुक्यातील खनलोशी येथील डोहामध्ये पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. मूळ राहणार श्रीवर्धन - काळींजे येथील सध्या नोकरीनिमित्त ठाणे (दिवा) येथील बेडेकर नगर येथे राहणारा तेजस सुनील निगुडकर सुट्टी घेऊन आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला असता याला म्हसळा तालुक्यातील खनलोशी येथील मोठ्या डोहामध्ये पोहोण्याच्या मोहापायी आपला जीव ेआपल्या नातेवाईकांसमोरच गमवावा लागला तरुण तेजस निगुडकर (24 वर्षे) याच्या बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई दिवा येथून आपल्या मूळ गावी श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे येथे आलेला तेजस सुनील निगुडकर आपल्या नातेवाईकांसहित चार मोटरसायकलने दिवेआगार येथे आपल्या मावशीच्या घरी भेट देऊन म्हसळा मार्गे परत श्रीवर्धनला आपल्या गावी जात असताना मध्ये खनलोशी गावाजवळ धरण सदृश्य असलेल्या खाणीच्या डोहात आपल्या अनुज कातळकर, तेजस निगुडकर आर्यन कांबळे, वेदांत निगुडकर, जय निगुडकर आणि श्लोक निगुडकर या नातेवाईकांसोबत पोहायला उतरला.
यावेळी पोहायला येत नसल्याने काठावर बसून तेजस ची काकी छाया, काका विजया व इतर नातेवाईक बसून या सर्वांना पोहताना पाहत होते. त्याचवेळी पाण्यामध्ये थोडे लांब अंतर गेल्यावर तेजस ला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला आणि क्षणार्धात आणि पाण्याखाली नाहीसा झाला.
डोहाच्या जवळपासच राहणार्या तेथील नागरिकांनी त्यामध्ये उडी मारून तेजसला पाण्यावर काढले पण तोपर्यंत तेजस मृत पावला होता. सदर घटने संदर्भात दिघी सागरी पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास एपीआय हनुमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर शेख हे करत आहे.
यापूर्वीही श्रीवर्धन म्हसळा तालुक्यात बुडून मृत्यू पावल्याच्या घटनांची संख्या वाढत असताना प्रत्येकाने मौज मस्ती करताना आपल्या जीवाची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाच आहे अशी भावना येथील जनतेकडून व्यक्त होत आहे.