

Monsoon rains arrive strongly in Raigad
अलिबाग : पुढारी वृत्तसेवा
शनिवार सकाळपासून अलिबाग शहर आणि ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. साधारणतः 1 तास पावसाने धुवाधार बॅटिंग केली त्यानंतर मात्र उन्ह पडले होते. त्यामुळे समुद्र किनारी पर्यटकांनी पुन्हा एकदा गर्दी पाहायला मिळाली.
दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळपासूनच पुन्हा एकदा हजेरी लावली. शाळा सुरु होणार असल्याने शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानामध्ये पालकांची लगबग दिसून येत होती.
मात्र पावसाने थोडीशी का होईना त्रधातिरपीत उडवली. बकरी ईद च्या सुट्टीमुळे पर्यटकांनी पुन्हा एकदा हजेरी लावल्याने रायगडमधील समुद्र किनारी गर्दी होती. पाण्यात जात येत नसले तरी उंट सवारी घोडागाडी याचा आनंद घेत होते. 7 जून सायंकाळी 5. 30 वाजेपर्यंत घेतलेल्या पावसाच्या नोंदीवरून सर्वात जास्त पाऊस उरण येथे 164 मिमी तर पोलादपूर, कर्जत येथे काहीच झाला नसल्याची नोंद आहे.
उर्वरित ठिकाणी अलिबाग 29 मिमी, मुरुड 28 मिमी, पेण 3 मिमी, पनवेल 44. 6 मिमी, खालापूर 55 मिमी, माथेरान 21 मिमी, सुधागड 16 मिमी, महाड 1 मिमी, माणगाव 21 मिमी, तळा 47 मिमी, श्रीवर्धन 3 मिमी, म्हसळा 64 मिमी, रोहा 40 मिमी असा एकूण 537. 6 मिमी इतका पाऊस जिल्ह्यात झाला. जिल्ह्यात आता शेतीच्या कामाना वेग येऊ लागला आहे.