Delayed Sowing Raigad
तळा : अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे तळा तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरवर्षीप्रमाणे व शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस पडला तरी एवढा पडत नसल्याने अंदाजानुसार पाऊस जास्तच होत आहे. शेतीवर याचा परिणाम होण्याचा धोका शेतकरी वर्गातून व्यक्त होते. अवकाळीमुळे धुळवाफे पेरणीचा मुहूर्त हुकला असून शेतीचे नियोजन बिघडले असल्याची चर्चा आहे.
मात्र सध्या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. आंब्याचे पीक उशीरा आल्याने आंब्याचेही नुकसान झाले असून विटभट्टी धारकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. तसेच घरे शाकारणीची कामे मे महिन्यात सुरू होतात त्यातही समस्या निर्माण झाल्या आहेत.
सध्या लग्न समारंभाचे दिवस तिथीनुसार असल्याने अनेक गावात एक तरी लग्न समारंभआहे. अंदाजे आठ ते नऊ दिवसांपासून दिवसातून एक दोन वेळा हा अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे लग्नसमारंभासाठी बांधलेला मांडव याची पुरती पावसाने भिजून दयनिय अवस्था होत आहे. मोठ्या आनंदाने हे विवाहसोहळा पार पडतात मात्र यावर्षी अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे लग्नघरी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाईलाजास्तव मंडपावर प्लास्टिक कापड टाकून मंडप सजवले जात आहेत.
अनेक ठिकाणी यामधे पाणीसाठून पाणी खाली पडत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड देत मंडप उभारून विवाह समारंभ पार पाडले जात आहेत. त्यातच अधूनमधून चाललेला विजेचा लपंडाव. अशा अनेक अडचणींना सध्या समोरे जावे लागत असून जनजीवन विसकळीत झाले आहे.
तालुक्यात खरिप हंगामात भाताचे क्षेत्र सरासरी १०३१ हेक्टर इतके आहे. तालुक्यात भात पिकाची सरासरी प्रति हेक्टरी २३७२ किलो इतकी उत्पादकता आहे. यावर्षी २०२५-२६ या खरिप हंगामासाठी कृषी विभागाने तालुक्यात १२०० हेक्टवर भात पिक घेण्याचे नियोजन केले आहे. तर हेक्टरी २९०० किलो भाताचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे.