रायगडमध्ये भाजप -राष्ट्रवादीविरुद्ध शिंदे शिवसेना खरा सामना रंगणार pudhari photo
रायगड

Raigad political battle : रायगडमध्ये भाजप -राष्ट्रवादीविरुद्ध शिंदे शिवसेना खरा सामना रंगणार

जिल्ह्यातील 10 नगर परिषदांपैकी 4 दुरंगी, 2 तिरंगी लढती

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः रायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून बहुतांश नगरपालिकेत भाजप अजित पवार राष्ट्रवादी युती विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत होत आहे. अलिबाग, रोहा, कर्जत आणि माथेरान या चार नगरपरिषदांमध्ये दुरंगी तर मुरुड व पेण नगरपरिषदेत तिरंगी लढती होणार आहेत. उरण आणि श्रीवर्धन नगरपरिषदांमध्ये चौरंगी, महाड नगरपरिषदेत पंचरंगी तर खोपोली नगरपरिषदेत बहुरंगी सामने होत असले तरी खरा सामना हा युतीतील मित्र पक्षात असाणार आहे.

अलिबाग नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाकरिता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड.कविता प्रविण ठाकूर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. परिणामी नगराध्यक्षपदाकरिता आता शेकाप, काँग्रेस, मनसे आघाडीच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक आणि भाजपा, शिंदे शिवसेनेच्या उमेदवार तनूजा पेरेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. नगरसेवकांच्या 20 जागांपैकी एका जागी शेकापचे प्रशांत नाईक बिनविरोध विजयी झाल्याने आता 19 जागांकरिता 41 उमेदवार रिंगणात आहेत.

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाच्या वनश्री शेडगे विरुद्ध शिवसेना (शिंदे) पक्षाच्या शिल्पा धोत्रे अशी थेट लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदाच्या 19 जागेसाठी 50 उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या 20 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेे. दरम्यान प्रभाग क्रमांक 2 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे राजेंद्र जैन हे बिनविरोध आले आहेत. नगरसेवक पदाच्या 19 जागेसाठी विविध पक्षाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना ( शिंदे) 13, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार ) 19, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी 5, शिवसेना ( उबाठा ) 4, भारतीय जनता पार्टी 3, अपक्ष 6 हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

माथेरान नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्येच खरी लढाई असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले असून अंतर्गत तिकीट नाकारलेल्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांना त्याचा थेट फटका काही प्रभागांमध्ये बसणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट व आरपीआय राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे शिवराष्ट्र पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गट, भाजपा आरपीआय पक्षाचा एक गट अशी महायुती या निवडणुकी सामोरे जाणार आहे. नगराध्यक्ष पदाकरिता महायुतीकडून चंद्रकांत चौधरी तर शिवराष्ट्र पॅनल कडून अजय सावंत यांच्या मध्ये ही निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदाच्या 20 जागांकरिता 46 उमेदवार रिंगणात आहेत.

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) आणि शिवसेना(उबाठा) यांच्या महापरिवर्तन विकास आघाडीच्या पुष्पा दगडे आणि भाजपा, शिवसेना (शिंदे) पक्ष या युतीच्या डॉ.स्वाती लाड यांच्यात थेट लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या 21 जागांकरिता 42 उमेदवार रिगंणात आहेत. पेणमध्ये भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पेणकर आघाडी पेण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीच्या प्रीतम ललित पाटील, पेणकर आघाडीच्या रिया धारकर आणि काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र येत असताना शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढत आहे. पेण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच सहा नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. हे सहाही नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) युतीचे आहेत. यामुळे आता 18 नगरसेवक पदासाठी 46 उमेदवार रिगंणात आहेत.

मुरुडमध्ये थेट नगराध्यक्षा पदाकरिता शिंदे शिवसेना पक्षांच्या कल्पना संदिप पाटील, शेकाप च्या अंकिता मनिष माळी आणि अजित पवार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आराधना मंगेश दांडेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.नगरसेवक पदाच्या 20 जागांकरिता 58 उमेदवार आता रिंगणात आहेत. श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जितेंद्र प्रभाकर सातनाक , शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अक्षता प्रितम श्रीवर्धनकर , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे अतुल अरविंद चौगुले , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे रवींद्र पोशा चौलकरअशी चौरंगी लढत होणार आहे.तर नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात आहेत.

उरणमध्ये चौरंगी लढत, भाजपा आणि शिवसेना(शिंदे) आमने सामने

उरण नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शोभा भुवन कोळी , महाविकास आघाडीकडून भावना कुंदन घाणेकर , शिवसेना (शिंदे) पक्षाकडून रुपाली तुषार ठाकूर, तर अपक्ष शेख नसरीन इसरार अशी चौरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या 21 जागांसाठी 48 उमेदवार रींगणात आहेत. येथे भाजपा आमदार महेष बालदी यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. खोपोली नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्ष व भाजपा विरुद्ध शिवसेना(शिंदे) पक्ष अशी लढत होत आहे. येथे ऱाष्ट्रवादीचे सुनील पाटील आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे कुलदिप शिंदे यांच्यात खरी लढत होणार आहे. अन्य सात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या 31 जागांकरिता 154 उमेदवार रिंगणात आहे.

महाड नगर परिषदेत पंचरंगी लढत, मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक

महाड नगरपरिषदेत चेतन उर्फ बंटी गजानन पोटफोडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सुदेश शंकर कलमकर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ), सुनील वसंत कविस्कर शिवसेना (शिंदे गट) व अन्य दोन अपक्ष उमेदवार अशी पंचरंगी लढत होणार आहे. तर नगरसेवक पदाच्या 20 पदांकरिता 48 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे मंत्री भरतशेठ यांच्या प्रतिष्ठेची ही नगरपरिषद निवडणूक आहे. त्यामुळे वातावरण तापू लागले असून यंदा प्रमुख पक्षांमधील लढत अटीतटीची होणार असल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT