

खानिवडे : वसईत यंदा सहा महिने बरसलेल्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले. तरीही या नैसर्गिक आपत्तीच्या वेदना बाजूला सारत भात पिकांची कापणी करून वसईतील शेतकऱ्यांची भात झोडणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र झोडणीनंतर येणार पिकाचा उतारा कमालीचा घटला आहे. लांबलेल्या पावसामुळे कणसांची लांबी घटली व दाणे भारणीचे वेळी सुद्धा पाऊस सुरूच असल्याने पिकामध्ये पलिन्द (वांझा दाणा) चे प्रमाण जास्त येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यंदा वसईच्या विविध ठिकाणच्या भागात मोठ्या प्रमाणात खरीपाची लागवड करण्यात आली होती. परंतु लांबलेल्या पावसाने शेतीचे नुकसान झाले. यामध्ये नुकसान झालेल्या हळव्या आणि निम गरव्या पिकांच्या कापण्या खोळंबल्याने त्या वेळेवर कापता आल्या नाहीत. हलवार व निम गरवार पावसात कुजले. तर गरव्या पिकांची वेळ पूर्ण होऊन ही ते कापण्यास उशीर झाला.
यामुळे परिपक्व तयार भात बऱ्याच प्रमाणात शेतात खडून गेले. त्याही स्थितीत कापणी केलेल्या भातपिकाचे भारे शेतकऱ्यांनी खळ्यात आणून त्यांच्या झोडणीला वेग दिला आहे. मात्र यंदा भात पिकाची दरसाल पेक्षा आणेवारी घटली आहे. वसई पूर्वेतील जूचंद्र, बापाणे, शिरवली, आडणे, भाताणे, खानिवडे, कामण, पोमण, नागले, मोरी, तर वसई पश्चिमेतील आगाशी, वटार, नंदाखाल, निर्मळ अशा ठिकाणी विविध ठिकाणी भात झोडणीची कामे सुरू आहेत. झोडणीनंतर लागलीच वाढवण्या केल्या जात आहेत.
यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादनातही घट झाली आहे. भाताचे कणीस मोठे दिसत असले तरी दाणा न भरलेले भात जास्त आहे. त्यामुळे जे काही थोडके उत्पादन हाती मिळेल त्यावर उदरनिर्वाह कसा भागवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर पुढील वर्षी भात पेरणीसाठी लागणारे बियाणे व उदरनिर्वाहासाठी लागणारा भात यांची सांगड कशी घालायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे .
दरवर्षी 80 ते 100 मण इतके भाताचे उत्पन्न मला येत होते यंदा लांबलेल्या पावसामुळे सुमारे 1 एकरवरील भातपिकाचे पूर्णपणे नुकसान झाल्याने उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मिळालेल्या उत्पन्नातून उदरनिर्वाह भागवायचा कसा असा प्रश्न भेडसावतोय.
आशालता कुडू, महिला शेतकरी