अलिबाग : सुवर्णा दिवेकर
हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात आणि जानेवारीमध्ये येणाऱ्या मकरसंक्रांत सणासाठी रायगड जिल्हयातील बाजारपेठा सजल्या आहेत. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये मडकी, तिळगुळ, पतंग, ऊस, फुले आदी वस्तू डेरेदाखल झाल्या आहेत.
मकरसंक्रातींची लगबग शहर उपनगरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. घराघरांत सुगडीपूजनासाठी लागणाऱ्या खरेदींची धामधूम सुरु असून त्यासह भोगीची तयारी, पूजेचे साहित्य आणि तिळगुळ खरेदीलाही उधाण आले आहे. फुलांच्या खरेदीपासून ते हलव्याच्या दागिन्यांना तरुणींपासून महिला वर्गाची पसंती मिळत आहे. मकर संक्रांत पारंपरिकरित्या साजरा केली जाते. संक्रांतीसाठी गूळ, तीळ, बाजरीचे तयार पीठ आदी वस्तूंनाही मोठी मागणी झाली आहे. सुवासिनी सुगडामध्ये हंगामातील भाज्या, धान्य घालून पूजन करतात.
भोगीच्या भाजीची तयारी भोगीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी केल्या जाणार्या भाजीसाठी वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर आंदीं खरेदी करतात. भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात दर वाढ झाली आहे.
यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली जात आहे. महिलांच्या मागणीनुसारच बाजारपेठेत वाण म्हणून प्लास्टिकच्या साहित्याला फाटा दिल्याचे दिसून येत आहे. तेल लावण्याचा ब्रश, तेल भरण्याची बाटलीसह इतर साहित्य कापडी पिशव्या वाणाच्या स्वरुपात हळदी-कुंकवासाठी आलेल्या महिलांना दिले जात आहे. त्यावस्तूना मागणी बाजारपेठ मध्ये असल्याचे दिसून येत आहे.
मकरसंक्रांत दरम्यान तिळगुळ, तिळाच्या वड्या, तिळाचा हलवा तसेच कपड्यांना विशेष महत्त्व असते. या कालावधीत थंडी असते आणि तीळ, काळे कपडे हे उष्ण असल्याने या हंगामात तिळाचे पदार्थ आणि काळ्या कपड्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. तर मकरसंक्रांतपासून अनेक युवक विविध प्रकारच्या रंगीबेरंगी पतंग उडवत असल्याने सायंकाळच्या सुमारास आभाळात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत पतंग उडवून त्या पतंग कटण्याची स्पर्धा पहायला मिळते.
रथसप्तमीपर्यंत संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन महिला करतात. पाच सुगडांची किंमत 40 ते 60 रुपये आहे, तर पूजेच्या साहित्याची किंमत 100 ते 150 रुपये आहे,मकरंद पाटील, विक्रेते