रायगडात सलग दुसऱ्या दिवशी पर्जन्यवृष्टी  pudhari photo
रायगड

Raigad Rain : रायगडात सलग दुसऱ्या दिवशी पर्जन्यवृष्टी

११९ मि.मी. पावसाची नोंद; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; भातशेतीला पोषक वातावरण

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्याला बुधवारी (२४ जून) जोरदार पावसाने झोडपले. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जनजिवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दिवसभरात ११९.१४ मि.मी. घ्या सरासरीने १ हजार‌ ९०६.२ मि.मी. पाऊस पडला. दरम्यान पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्यात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, वीज पुरवठा खंडीत होणे, वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटनाची नोंद झाली आहे.

मंगळवारी संध्याकाळपासून जिल्ह्यात उत्तरेकडील तालुक्यामध्ये पावासाचा जोर वाढण्यास सुरूवात झाली. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती बुधवारी पहाटे आणि सकाळच्या सत्रात पावासाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे जिल्ह्यांच्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, कोरडे झालेले ओढे आणि नाले पून्हा प्रवाही झाले आहेत. प्रादेशिक हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्यात खरीप हंगामात ७४ हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे. जून महिन्यातील पहिले तीन आठवडे पाऊस न पडल्याने पेरणीची कामे खोळंबली होती.

हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान दरड कोसळल्याने पायरी मार्ग बंद झाला आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत पायरी मार्गावर आलेले दगड बाजूला करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून, पुढील दोन दिवस पायरी मार्ग बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनानं जाहीर केले आहे.

शनिवारी २७ जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनांमुळे बांधकाम विभागाने या संदर्भात अधिक खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा शिवभक्त व स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

पनवेल शहरातील उन्नत पुलावर ‘धबधबे’

खांदा कॉलनी : पनवेल शहरात सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने उन्नत पुलावरील दुरुस्ती कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अवघ्या काही मिनिटांच्या पावसात पुलाच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत खाली कोसळू लागल्याने पुलावर अक्षरशः धबधबे सुरू झाल्याचा अनुभव वाहनचालकांना आला.

विशेष म्हणजे मागील वर्षी पुलावरील गळती थांबविण्यासाठी लाखो रुपये खर्च करून दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. मात्र यंदाच्या पहिल्याच पावसात पुन्हा तीच समस्या समोर आल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलावरून अचानक कोसळणाऱ्या पाण्यामुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांची मोठी गैरसोय झाली. वाहन चालविताना समोरून पडणाऱ्या पाण्यामुळे दृश्यमानता कमी होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसली तरी भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

झाडे कोसळली

मुंबई पुणे जुन्या महामार्गावर दांडफाटा जवळ पुणेकडील बाजूस झाड पडल्याने, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक यंत्रणा, पोलीस आणि महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी आयआरबी कडून पडलेले झाड हटविण्याचे काम हाती घेतले. झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

महामार्गावरील वाहतूक धिम्यागतीने

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई नजीक डोंगरावरील माती महामार्गावर आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. प्रशासनाकडून केवळ एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे हॉटेल अन्नपूर्णा ते चोळई दरम्यान २ किलोमीटर अंतरावर एकेरी वाहतूक सुरू होती. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करतेवेळी कशेडी घाटातील बहुसंख्य डोंगराचा भाग उभा कापल्यामुळे चोळई हद्दीत दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भोगाव हद्दीतील जुन्या महामार्गावर खचलेल्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठमोठे दगड रस्त्यावर आले असून या ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार कायम राहिली आहे.

दिवसभरातील पाऊस (मि.मी.मध्ये)

अलिबाग : १२८, मुरुड : ८५, पेण: १६०, पनवेल : १४७.२, उरण : १३५, कर्जत : ८९, माथेरान : ९७, खालापूर : ९३, रोहा : ५९, सुधागड : १४४, माणगाव : १००, तळा : १७४, महाड : ९८, पोलादपूर : १२९, श्रीवर्धन : ९५, म्हसळा : १७३.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT